मीनाक्षी शेषाद्रीच्या अकाली मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम, तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं...
सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात कोरोनाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं.

मुंबई : बॉलिवूडमधील 80 आणि 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या काळातील सर्व बड्या स्टार्ससोबत काम करणार्या मीनाक्षी शेषाद्रीच्या अकाली मृत्यूच्या अफवांना रविवारी संध्याकाळपासूनच वेग आला होता. तिच्या निधनाबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात कोरोनाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. मात्र स्वत: मीनाक्षी शेषाद्रीने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
स्वतःबाबत सुरु असलेल्या अफवांसंबंधी मीनाक्षी शेषाद्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठीक असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिकेच्या डॅलास शहरात पती आणि दोन मुलांसोबत राहणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे आणि फक्त दोन शब्द लिहिले - डान्स पोज! या पोस्टद्वारे तिने आपल्या मृत्यूशी संबंधित सर्व अफवांना आळा घातला आहे.
View this post on Instagram
मीनाक्षी शेषाद्रीने 1983 साली पेंटर बाबू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्याच वर्षी रिलीज झालेल्या हिरो चित्रपटात ती झळकली होती. त्यानंतर 1985 साली तिने हरीश म्हैसूर नावाच्या एका इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न केले आणि त्यानंतर लवकरच ती अमेरिकेत स्थायिक झाली. अनेक नृत्य प्रकारांमध्ये माहीर असलेल्या मीनाक्षी शेषाद्रीने अमेरिकेच्या टेक्सासमधील डॅलास शहरात डान्स स्कूल सुरु केलं आहे.
मीनाक्षीने पेंटर बाबू, हिरो ,आवारा बाप व्यतिरिक्त, इनाम दस हजार, घर हो तो ऐसा, आवारगी, लव्हर बॉय, महागुरू, शहंशाह, आंधी तुफान, स्वाति, मेरी जंग, डकैत, जुर्म, परिवार, गंगा जमुना सरस्वती, दहलीज, घराना, घायल, दामिनी सारख्या अने चित्रपटांमध्ये काम केलं. 1981 साली वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मीनाक्षीने 'मिस इंडिया' सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. सनी देओल सोबतचा 1996 साली आलेला घातक हा तिच्या अखेरचा सिनेमा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
