(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : कंगना रनौत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!
या चित्रपटात ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणी परिस्थितीवरही प्रकाश टाकला जाईल.
मुंबई : कंगना रनौत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाईवी' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर आता कंगना रनौत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका ज्या चित्रपटात साकारणार आहे, तो बायोपिक नसणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
कंगना व्यतिरिक्त या सिनेमात इतर अनेक आघाडीचे कलाकार काम करताना दिसतील. कंगनाने अलीकडेच जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाईवी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय कंगनाने ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. तसेच अलीकडेच कंगनाने 'मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिड्डा' आणि 'अपराजिता अयोध्या' नावाच्या चित्रपटांची घोषणा देखील केली.
इंदिरा गांधी यांच्या भूमिकेविषयी कंगना म्हणाली की, हो, आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत आणि या चित्रपटाची स्क्रिप्ट लवकरच पूर्ण होईल. हा चित्रपट इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसेल. मात्र आजकालच्या पिढीला देशातील सद्य सामाजिक-राजकीय परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणारा भव्य चित्रपट असेल. कंगनाने पुढे म्हटलं की, आणखी बरेच नामांकित कलाकार या चित्रपटात काम करतील आणि इंदिरा गांधी म्हणून मी भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप उत्साही आहे.
हा चित्रपट एका पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटात ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणी परिस्थितीवरही प्रकाश टाकला जाईल. या चित्रपटाच्या माध्यमातून इंदिरा गांधींव्यतिरिक्त राजीव गांधी, संजय गांधी, मोरारजी देसाई, लाल बहादूर शास्त्री या काळातील तत्कालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिरेखादेखील पडद्यावर आणली जाणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनय करण्याशिवाय या चित्रपटाची निर्मिती देखील कंगना करणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा दिग्दर्शक साई कबीर यांनी लिहिली आहेत, जे या चित्रपटाचे दिग्दर्शनही करतील. साई कबीरने कंगना रणौत स्टारर फिल्म 'रिव्हॉल्व्हर राणी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.
संबंधित बातम्या