Jeta : 25 नोव्हेंबर रोजी 'जेता' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नीतिश आणि स्नेहल साकारणार प्रमुख भूमिका
'जेता'(Jeta) या आगामी मराठी चित्रपटात नीतिश चव्हाण आणि स्नेहल देशमुख हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
Jeta: चंदेरी दुनियेत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. कोणताही लेखक-दिग्दर्शक कथानक आणि कॅरेक्टरच्या आवश्यकतेनुसार कलाकारांची निवड करत असतो. यात मुख्य कलाकारांची निवड हा लेखक-दिग्दर्शकापुढील मोठा टास्क असतो. कथानकाची गरज ओळखून मुख्य भूमिकेत अचूक कलाकारांची निवड करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुढील प्रवास सोपा बनतो. यामुळे चित्रपटांमध्ये कधी जुन्याच जोड्या नव्या कॅरेक्टरमध्ये दिसतात, तर कित्येकदा नवीन जोड्या जुळवत कलाकार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. 'जेता'(Jeta) या आगामी मराठी चित्रपटात अशीची एक नवी कोरी जोडी रसिकांचं मनोरंजन करणार आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचल्यावर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा नीतिश चव्हाण आणि स्नेहल देशमुख यांची जोडी 'जेता'चं मुख्य आकर्षण बनली आहे.
निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी सहनिर्माते मिहीर संजय यादव यांच्या साथीने संजू एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 'जेता'ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश साहेबराव महाजन यांनी केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका जिद्दी तरुणाची कथा रसिकांसमोर आणण्यासाठी निर्माते संजय लक्ष्मणराव यादव आणि दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांना एका कणखर अभिनेत्याची गरज होती. खरं तर चित्रपटाच्या लेखन प्रक्रियेपासूनच त्यांच्या नजरेसमोर एक नाव होतं. ते म्हणजे नीतिश चव्हाण. झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय झालेल्या 'लागीरं झालं जी' या मालिकेत अजयची मुख्य भूमिका साकारणाऱ्या नीतिशचा 'जेता' चित्रपटापर्यंतचा प्रवास खूप रोमांचक आहे.
'हर हर महादेव', 'सोयरीक', 'मजनू' आणि 'चतुर चोर' या चित्रपटांमध्ये नीतिशच्या अभिनयाची विविध रूपं प्रेक्षकांसमोर आली आहेत. आता या चित्रपटात तो परिस्थितीपुढे हतबल न होता लढणाऱ्या एका जिगरबाज तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडी स्नेहल देशमुख ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. स्नेहलने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. नीतिश आणि स्नेहल या दोघांची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नीतिशनं या चित्रपटात एक जिद्दी तरुण साकारला असून, त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या एका श्रीमंत कुटुंबातील तरुणीच्या भूमिकेत स्नेहल दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी एका फ्रेश जोडीची आवश्यकता होती आणि नीतिश-स्नेहलच्या रूपात ती पूर्ण झाल्याचं मत दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांनी व्यक्त केलं आहे. अनेकांसाठी प्रेरणादायी ठराव्या अशा या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण संदेशही दडला असल्याचंही महाजन म्हणाले.
नीतिश-स्नेहल या जोडीसोबत या चित्रपटामध्ये शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे, कुणाल मेश्राम आदी कलाकार आहेत. 25 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'जेता'ची कथा संजय लक्ष्मणराव यादव यांनी लिहिली आहे. योगेश सबनीस आणि योगेश साहेबराव महाजन यांच्या साथीने संजय लक्ष्मणराव यादव यांनीच पटकथालेखनही केलं आहे. याशिवाय संजय लक्ष्मणराव यादव यांनी येगेश सबनीस यांच्यासोबत संवादही लिहिले आहेत. डिओपी अनिकेत के. यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी रसिकांना खिळवून ठेवणारी असून, संकलक हर्षद वैती यांच्या संकलनाची जादू या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.
वाचा इतर महत्तावाच्या बातम्या:
Jeta : समाजऋण महत्त्वाचे! सेलेब्रल पाल्सीग्रस्त तरुणाने केले 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण