Jeta : समाजऋण महत्त्वाचे! सेलेब्रल पाल्सीग्रस्त तरुणाने केले 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
Jeta Poster Launch : दोन्ही हात काम करत नसल्यामुळे सर्व कामे पायाने करणाऱ्या सत्यम लिंगाळे यांच्या ‘पदस्पर्शा’ने 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले.
Jeta Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टी ही नेहमीच सृजनात्मक आणि प्रायोगिक चित्रपटांसाठी ओळखली जाते. मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक भारतीय सिनेजगतात वेगवेगळ्या विषयांवर आशयघन चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. याच साखळीतील पुढची कडी आहे, संजू एंटरटेनमेंट निर्मित आगामी चित्रपट 'जेता' (Jeta). निर्माता संजय लक्ष्मणराव यादव यांची जीवनप्रेरणा व दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांचे अभ्यासपूर्ण दिग्दर्शन यातून आगामी 'जेता' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड म्हणून सिद्ध होण्यास सज्ज झाला आहे.
'जेता' चित्रपटाची कथा ही एका तरुणाच्या दैवाशी संघर्षाची सत्यकथा आहे. कोणत्याही ख्यातनाम व्यक्तीच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करता येणे सहज शक्य असूनही, चित्रपट निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी व्यक्तिगत मानसन्मान यापेक्षा समाजऋण महत्त्वाचे मानून वास्तविक आयुष्यात ‘जेता’ असलेल्या व्यक्तीच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार 'हरायचं नाही जिंकायचं' या चित्रपटाच्या उक्तीचे मुर्तीमंत प्रतिक असलेल्या आर.जे.ठाकूर कॉलेज, सावरकरनगर, ठाणे येथील टी.वाय.बी.ए.चा दिव्यांग विद्यार्थी सत्यम लिंगाळे याच्या (दोन्ही हात काम करत नसल्यामुळे सर्व कामे पायाने करणाऱ्या) पदस्पर्शाने 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले.
सेलेब्रल पाल्सीग्रस्त तरुणाने केले पोस्टर अनावरण
सत्यम लिंगाळे जन्मजातच सेलेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त असून त्यांच्या दोन्ही हातांमध्ये संवेदना नाहीत. तसेच, पायांमध्ये देखील तोकडेच बळ असल्याने स्वबळावर चालू शकत नाहीत. तरी देखील आत्तापर्यंतचे टी.वाय.बी.एचे शिक्षण त्यांनी पायाने लिहायला शिकून पूर्ण केले आहे. पुढील आयुष्यात एमपीएससी परीक्षा उतीर्ण होऊन कर्तबगार सरकारी अधिकारी होण्याचा त्यांचा निर्धार आहे.
दुर्दैवाने घडलेल्या आघाताने खचून न जाता आयुष्यामध्ये 'जेता' बनण्याची ही अशी जिद्द समाजात निर्माण करणे हेच 'जेता' चित्रपटाच्या निर्मितीचे मूळ कारण आहे. साहजिकच पोस्टर अनावरणाच्या निमित्ताने वास्तविक जगातल्या एका जिद्दीच्या 'जेता' तरुणाच्या हस्ते उदघाटन करुन व त्याचा सत्कार करुन त्याच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देऊन 'जेता' चित्रपटाच्या सर्व संघाने महाराष्ट्रात प्रथमच पोस्टर अनावरणाचा असा आगळा-वेगळा आदर्शवत पायंडा पाडला आहे.
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
'जेता'ची कथा संजय लक्ष्मणराव यादव यांनी लिहिली असून, योगेश सबनीस आणि योगेश साहेबराव महाजन यांच्यासोबत संजय लक्ष्मणराव यादव यांनीच पटकथा लेखन केलं आहे. संवादलेखन संजय लक्ष्मणराव यादव आणि योगेश सबनीस यांनी केलं आहे. नीतिश चव्हाण, स्नेहल देशमुख, शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे आदी कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातील श्रवणीय गाण्यांना कबीर शाक्य यांनी संगीतबद्ध केले आहे. अनिकेत के. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, हर्षद वैती यांनी संकलन केलं आहे. हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :