"जावेद अख्तर मला म्हणाले होते तू आत्महत्या करशील," कंगना रनौतचा गंभीर आरोप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील कंपूबाजीवर जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने खुलेआमपणे बॉलिवूडमधल्या नेपोटिझमवर भाष्य केलं. आता कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तू आत्महत्या करशील, असं जावेद अख्तर म्हणाल्याचं तिने सांगितलं.
मुंबई : अभिनव कश्यप, सोनू निगम यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री कंगना रनौतनेही बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या नेपोटिझमच्या दहशतीचा बुरखा फाडला आहे. हृतिक रोशन आणि माझा वाद सुरु होता तेव्हा जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावून या वादात न पडण्याचा सल्ला दिला होता. मी तसं केलं नाही तर मला काम मिळणार नाहीत शिवाय मला आत्महत्याही करायला भाग पाडले जाईल, असंही जावेद अख्तर म्हणाल्याचं तिने सांगितलं. यामुळे आता हिंदी इंडस्ट्रीची काळी बाजू पुरती बाहेर आली आली आहे.
कंगना रनौतने नुकतंच एक परिपत्रक जारी करुन म्हटलं की, "सुशांतसोबत झालं त्यात काही नवीन झाली. ज्याप्रकारे आज महेश भट सुशांत सिंह राजपूतच्या मानसिक तणावाची तुलना परवीन बाबी यांच्यासोबत करत आहेत, असंच काहीसं माझ्याबाबतीतही घडलं होतं. या प्रसंगाबद्दल सांगताना कंगना म्हणाली की, "जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावून माफी मागण्याचा सल्ला दिला होता."
कंगना म्हणाली की, "एक दिवस जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं आणि मी राकेश रोशन यांच्यापासून दूर राहावं असं समजावलं. राकेश आणि त्यांचं कुटुंब हे मोठे लोक आहेत. जर तू त्यांची माफी मागितली नाही तर तुला बॉलिवूडमध्ये अडचणी येतील. ते लोक तुला जेलमध्ये पाठवतील. तू उद्ध्वस्त होशील. मरण्याशिवाय दुसरा पर्याय तुझ्याकडे नसेल. तू आत्महत्या करशील. असं जावेद अख्तर मला बोलले होते. त्यांनी असा का विचार केला आणि म्हणाले की जर मी हृतिकची माफी मागितली नाही तर आत्महत्या करेन? यावेळी ते मला ओरडलेही होते."
कंगना पुढे म्हणाली की, "ज्याप्रकारे सुशांतचं यशराजसोबत कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याला त्रास देण्यात आला, तसंच माझ्यासोबतही घडलं होतं. आदित्य चोप्राने मला 'सुलतान'मध्ये काम करण्याबाबत विचारणा केली होती. परंतु मी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर आदित्यने मला फोन करुन पुन्हा कधीच काम न देण्याची धमकी दिली होती. यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक जण माझ्याविरोधात उभे राहिले. लव लाईफमध्येही मला त्रास दिला आणि सहा खटले दाखल करुन जेल पाठवण्याची तयारीही केली. यामुळे मी अतिशय तणावात होते."
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौतने खुलेआम म्हटलं होतं की "ही आत्महत्या नसून हत्या आहे." तिने व्हिडीओ शेअर करत बॉलिवूडमधील कंपूबाजीवर आरोप केले होते. तिच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर नेपोटिझमची जोरदार चर्चा रंगली आहे.