(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Safed First Look : 'सफेद' सिनेमाचा फर्स्ट लूक समोर; ए. आर. रहमान यांच्या हस्ते कान्समध्ये पोस्टर लॉन्च
Safed : 'सफेद' सिनेमाचा फर्स्ट लूक ए. आर. रहमान यांनी लॉंच केला आहे.
Safed First Look : जगभरातील अनेक दिग्गज 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला (Cannes Film Festival 2022) हजेरी लावत आहेत. संदीप सिंह दिग्दर्शित 'सफेद' (Safed) सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये करण्यात आले आहे. 'सफेद' सिनेमाचा फर्स्ट लूक ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांनी लॉंच केला आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला पोस्टर लॉंचचा कार्यक्रम
पोस्टर लॉंचच्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले अभय वर्मा आणि मीरा चोप्रा यांच्यासह लेखक-दिग्दर्शक संदीप सिंह, निर्माता विनोद भानुशाली आणि सहनिर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता हे सेलिब्रिटी उपस्थित होते. क्वचित दिसणाऱ्या पण अस्तित्वात असलेल्या समाजाविषयीचे सत्य सांगणारी या सिनेमाची कथा विशेष भावणारी आहे.
'सफेद' सिनेमाच्या पोस्टर लॉंचच्या कार्यक्रमादरम्यान ए. आर. रहमान म्हणाले, 'सफेद' सिनेमाचा टीझर मी पाहिला. अतिशय मनोरंजक, रंगीत आणि महत्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणारा हा सिनेमा असेल, याचा टीझरवरुन अंदाज येतो". सफेद सिनेमाचे दिग्दर्शक संदीप सिंह म्हणाले," जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमानने 75 व्या कान्स फिल्म फेस्टिवलदरम्यान माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाचा पहिला लूक लाँच करून आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. माझे एक स्वप्न सत्यात उतरले आहे".
सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला अभय वर्मा म्हणाला,"प्रत्येक अभिनेत्याची महत्त्वाकांक्षा ही कान्समध्ये डेब्यू सिनेमा करण्याची असते आणि मी इथे आज उभा आहे याने मी धन्य झालो आहे. दिग्दर्शक संदीप सिंह यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे हा प्रवास खरोखरच संस्मरणीय ठरला. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की माझ्या सिनेमाचा पहिला लूक आपल्या देशाची शान, ए. आर. रहमान यांच्या हस्ते झाला आहे.
मुख्य अभिनेत्री मीरा चोप्रा म्हणाली, 'सफेद' हा माझ्यासाठी खास सिनेमा आहे. महत्त्वाचा संदेश देणाऱ्या 'सफेद' सिनेमाचे पोस्टर कान्स सारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या हस्ते लॉंच झाले आहे. ही अतुलनीय बाब आहे.
'सफेद' सिनेमात अभिनेत्री मीरा चोप्रा आणि अभय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तर लेखक संदीप सिंह यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून हा सिनेमा भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज यांनी प्रस्तुत केला आहे. तर विनोद भानुशाली आणि अजय हरिनाथ सिंह यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. तर सहनिर्माते म्हणून निर्माते कमलेश भानुशाली, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली आहे.
संबंधित बातम्या