(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Bajpayee | मनोज.. आत्महत्या आणि बिहारी मुलगा
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मधील काळी बाजू समोर आली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यानेही त्याच्या आयुष्याचा प्रवास सांगताना एकेकाळी माझ्या मनातही आत्महत्या करण्याचे विचार आले असल्याचं सांगितलं.
मुंबई : शेखर कपूर दिग्दर्शित बॅंडिट क्वीन हा सिनेमा आठव तोय? हा सिनेमा आला होता 1994 मध्ये. हा सिनेमा गल्लाभरू चित्रपटांच्या चोकटीत बसणारा नव्हता. त्यामुळे कदाचित फार कमी लोकांनी तो पाहिला असेल. त्यानंतर चार वर्षांनी आलेला सत्या.. आठवतोय? हा सिनेमा आला होता 1998 ला. म्हणजे चार वर्षांनी. या दोन्ही सिनेमांचा परस्पर फारसा संबंध नाही. या दोन्ही सिनेमात आहे अभिनेता मनोज वाजपेयी. एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला मनोज.. हट्टाने अभिनयात करीअर करायचं ठरवतो.. दिल्लीला येतो. राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीत जातो. एक दोन नव्हे, तर तीन वेळा नाकारला जातो.. आणि? मग..? मग त्याला भेडसावू लागतात आत्महत्येचे गहिरे काळे विचार. होय.. अभिनेता मनोज वाजपेयीनेच इन्स्टावरच्या एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली. पण ही एकच गोष्ट ऐकण्यासारखी नाहीय. ही बातमी पूर्ण वाचलीत तर त्यातून प्रेरणाही मिळेल हे नक्की.
बिहारमध्ये अवघ्या नवव्या वर्षी मनोजला अभिनयाची आवड लागली. त्यावेळचे त्याचे हिरो होते अमिताभ बच्चन. आपण अभिनय करायचा हे त्यानं नवव्या वर्षी ठरवलं. बघता बघता गावातलं शिक्षण पूर्ण झालं. मनोज 17 वर्षाचा झाला. अभिनयाचा किडा अंगात होताच. म्हणूनच त्याने दिल्ली गाठली. कोण कुठला बिहारचा पोट्टा.. एनएसडीत जाणार म्हणून बसला. तिथे जायचं तर भाषा उत्तम हवी. हिंदी, इंग्रजी यायला हवी. मनोज त्या भाषा शिकू लागला. त्याचवेळी एनएसडीची परीक्षा देणं सुरू झालं. एक दोनदा नव्हे तर तीनदा तो रिजेक्ट झाला. आपल्याला जे करायचं आहे ते करता येत नसल्याबद्दल चीड होतीच. आता अभिनय नाही तर काहीच नाही असं त्याच्या मनात आलं आणि पहिला विचार आला आत्महत्येचा. 'तीनवेळा रिजेक्ट झाल्यानंतर मात्र माझा संयम सुटला. आता जगायचं कशाला असंच वाटून गेलं. आणि माझ्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. तेव्हा मात्र माझ्या मित्रांनी मला सावरलं. त्यांना माझी खूप काळजी वाटून गेली. म्हणून त्या काळात हे मित्र मला कुठेही एकटं सोडेनात. माझ्यासोबत ते राहू लागले. पुढे मी चौथ्यांदा एनएसडीत प्रवेश मिळवला', मनोज सांगतो. अर्थात इथून बाहेर पडलं की वेगळा स्ट्रगल. त्यावेळी त्याला पहिली ऑफर आली ती बॅंडिट क्वीनची. त्याचं सिलेक्शन झालं होतं. त्याचा एनएसडीतला मित्र तिग्मांशू धुलियाच ही बातमी घेऊन त्याच्याकडे आला होता. ही ऑफर आल्यानंतर मनोज मुंबईत आला. एका चाळीत हे पाच मित्र राहू लागले. या सिनेमातला छोटा रोल मनोजने केला. 'एका चाळीत पाच लोक राहून आमचा स्ट्रगल सुरू झाला. बॅडिट क्वीननंतर मी अनेकांकडे गेलो. ऑडिशन व्हायच्या. पण मी त्यावेळच्या हिरोसारखा दिसत नव्हतो. त्यामुळे या आऊटसायडरसाठी काम नव्हतं. यातल्या एका साहाय्यक दिग्दर्शकाने तर माझे फोटोही फाडून टाकले होते. तब्बल तीन प्रोजेक्ट माझ्या हातून गेले. आणि मग मला सत्या मिळाला.' हे मनोज सांगत असतानाच मध्ये तब्बल चार वर्षांचा काळ गेलेला असतो. 'सत्या' सिनेमाने भिकू म्हात्रेच्या रुपाने मनोजला ओळख मिळाली. पुरस्कार मिळाले. त्यानंतर शूल, कौन, गॅग्ज ऑफ वासेपूर, अय्यारी, स्पेशल 26 असे 67 सिनेमे त्याने केले. 'भिकू म्हात्रेनंतर मला सिनेमे मिळाले. मग मी मुंबईत घर घेतलं. त्यानंतर इथे आपण टिकू शकतो असं मला वाटलं, ' असं तो सांगतो. 'तु्म्ही जेव्हा एखादं उद्दीष्ट गाठायचं ठरवता तेव्हा तुमच्यासमोर अडचणी येणार असतातच. पण तुमच्यासमोर किती अडचणी आल्या हे महत्वाचं नाहीय. तर त्या एका नऊ वर्षाच्या बिहारी मुलाचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवलात हे महत्वाचं आहे, ' असं मनोज सांगतो.Nana Patekar visits Sushant's house | नाना पाटेकर सुशांत सिंह राजपूतच्या घरी, कुटुंबियांचं सांत्वन