Jersey : शाहिदच्या 'जर्सी' सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
Jersey : शाहिद कपूरचा आगामी 'जर्सी' सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Jersey : शाहिद कपूरच्या 'जर्सी' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वामित्त्व हक्काचं (कॉपी राईट्स) उल्लंघन केल्याचा आरोप करत दाखल झालेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावल्यानं पुढील आठवड्यांत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
याचिकाकर्ते हे मुळ तेलगू चित्रपटाच्याविरोधात नुकसान भरपाई न मागता त्याऐवजी दोन वर्षांनी प्रदर्शित होणाऱ्या या हिंदी रिमेकसाठी भरपाई मागत आहेत. त्यांना तेलगू चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याचा दावा अनाकलनीय आहे, असा युक्तिवाद निर्माता अल्लू अरविंद यांच्यावतीनं अँड. डॉ. बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात केला. तसेच तेलगू चित्रपट हिंदीत डब करून ओव्हर द टॉप (ओटीटी)वर उपलब्ध करण्यात आला होता. तोही 10 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला असून तो सध्या युट्युबवरही उपलब्ध आहे. मुळात या चित्रपटाची कथाही क्रिकेटवर आधारित असून अनेकांनी तो पाहिला असून त्याची प्रशंसाही केली तरीही लेखकांना त्याची माहिती नाही, हे अनाकलनीय आणि अविश्वसनीय आहे. असा दावाही अँड. सराफ यांनी हायकोर्टात केला. त्यामुळे स्वामित्व हक्काचे उल्लंघन झाल्याचं याप्रकरणात सिद्ध होत नाही. याशिवाय या चित्रपटतील पटकथेची नोंदणी केल्यानंतर ती सामायिक केलेली नव्हती. त्यामुळे याचिकाकर्त्यांचे आरोप अयोग्य असल्याचा दावाही अँड. सराफ यांनी केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने लेखक जैस्वाल यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी फेटाळून लावली.
'जर्सी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी फिल्म रायटर्स असोसिएशनकडे असलेल्या नोंदणीकृत 'द वॉल' नावाच्या स्क्रिप्टची चोरी केल्याचा दावा करत लेखक रजनीश जैस्वाल यांनी अँड. विशाल कानडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. स्वामित्त्व हक्काचे उल्लंघन केल्यामुळे येत्या 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून केली गेली होती. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्यासमोर सुनावणी पार पडली. 'जर्सी' या चित्रपटाची मुळ संकल्पना, पटकथा, साल 2019 मध्ये आधीच प्रदर्शित झालेल्या एका तुलगू चित्रपटावर आधारित आहे. चित्रपटातील पटकथा चोरीच्या आरोपापासून दूर राहण्यासाठी त्यात किंचित फेरफारही करण्याची काळजी घेण्यात आल्याचा आरोपी याचिकार्त्यांच्यावतीनं करण्यात आला. तसेच त्यामुळे जैस्वाल यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी यातनं बक्कळ नफा कमावला असून आता याच तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक येत आहे. त्यामुळे प्रतिवादींनी एकमेकांच्या संगनमतानं आपली फसवणूक केल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीनं अँड. विशाल कानडे यांनी हायकोर्टात केला होता.
अभिनेता शाहीद कपूर, मृणाल ठाकूर आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'जर्सी' हा साल 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जर्सी' या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असून त्यात नैनी आणि श्रद्धा श्रीनाथ यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले असून हा चित्रपट येत्या 22 एप्रिलला देशभरातील चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या























