(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Godawari movie : गोदावरी सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता जितेंद्र जोशी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
गोदावरी सिनेमा 3 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर होते आहे गोदावरी सिनेमाचे कौतुक
Godawari movie : गोदावरी सिनेमाची गेले अनेक दिवस सिने वर्तुळात चर्चा होत होती. मराठीतीत एक उत्तम अभिनेता जितेंद्र जोशी आतापर्यंत नाटक, सिनेमा, मालिका, वेब मालिकांमध्ये अभिनय करताना दिसून आला आहे. तर तो उत्तम लेखक देखील आहे. त्याने अनेक कविता देखील लिहिलेल्या आहेत. त्याच्या कवितांसाठी त्याचा चाहतावर्ग त्याला तुफान प्रतिसाद देत असतो. आता या सगळ्या भूमिका पार केल्यानंतर या अवलियाने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले आहे. लवरकच त्याने प्रदर्शित केलेला गोदावरी सिनेमा प्रेक्षकांच्या
भेटीला येणार आहे.
जितेंद्र जोशीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. सिनेमाच्या पोस्टरसोबत त्याने कॅप्शन दिलं आहे, गोदावरी येते आहे 3 डिसेंबर 2021 ला, आमच्या कुटूंबाची गोष्ट पहा तुमच्या कुटुंबियांसोबत.
फक्त चित्रपटगृहात. या चित्रपटाची निर्मिती ब्लूयू ड्रॉप फिल्मस आणि जितेंद्र जोशी यांनी केली आहे. जितेंद्र जोशी, नीणा कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोकले या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. संगीत देवबाभळी या प्रायोगिक नाटकानंतर त्याचे प्रसाद कांबळींनी व्यावसासिक नाटकात रुपांतर केले होते. या नाटकाने प्रचंड यश मिळवले होते. या नाटकाचे लेखन केलेल्या प्राजक्त देशमुखनेच गोदावरी सिनेमाचेदेखील लेखन केले आहे. सिनेमालिखानासाठी निखिल महाजनची साथ मिळाली आहे.
गोदावरी सिनेमाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले आहे. "आम्ही ठरवलं होतं एक कागदाची होडी करू आणि सोडू नदीत. जिथेजिथे पोहोचेल तिथून हाक येईल. पाहू कुठं कुठं पोहोचते? पहिली हाक आली आहे व्हॅन्कुवर (कॅनडा) इथून. गोदावरी पहिल्यांदा मोठ्यापडद्यावर झळकणार. व्हॅन्कुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये. नदीत सोडलेली आठवण जितकी गहिरी...तितके तिचे तरंग दूरवर पसरतात. पहिलाच तरंग कॅनडापर्यंत पोहोचला आहे. गोदावरी उमगाचे साक्षीदार व्हा" अशी पोस्ट सिनेमातील कलाकारांनी केली आहे. अशा पद्धतीने गोदावरीचा वर्ल्ड प्रिमिअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये पार पडला आहे.
गोदावरी सिनेमा 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक मोठे कलाकारदेखील असा चांगला सिनेमा पाहण्याची वाट बघत होते. त्यांनीदेखील सोशल मीडियावर गोदावरीतील कलाकारांचे कौतुक
भरभरून कौतुक केले आहे. हा सिनेमा निखिल महाजनने दिग्दर्शित केला आहे. सिनेमाचा ट्रेलरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला चाहते उत्तम प्रतिसाद देताना दिसून येत आहेत.