(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahesh Tilekar : 'नाटकी कलाकारांची झुंडशाही', महेश टिळेकरांची मराठी कलाकारांवर टीका
Mahesh Tilekar : महेश टिळेकरांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mahesh Tilekar Facebook Post : महेश टिळेकर (Mahesh Tilekar) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. आता त्यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मराठी कलाकारांवर टीका केली आहे.
महेश टिळेकर विविध विषयांवर त्यांचं मत मांडत असतात. आता त्यांनी 'नाटकी कलाकारांची झुंडशाही' असे म्हणत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी कलाकारांना धारेवर धरले आहे.
फेसबुक पोस्टमध्ये महेश टिळेकरांनी लिहिले आहे, "नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार कलाकारांची स्तुती करणारे काही ग्रुप, टोळी मराठी चित्रपटसृष्टीतील आहेत. अभिनय आणि सिनेमा कोळून पिल्यासारखे फक्त आपल्याच स्टार कलाकारांच्या सिनेमावर भरभरून बोलणारी ही मंडळी नवीन कुणाचा, म्हणजेच बाहेरून आलेला कलाकार किंवा दिग्दर्शक असेल तर त्याच्या सिनेमाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. स्वतः ला सुपरस्टार समजणारे हे काही ठराविक लोक पृथ्वी जशी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली आहे तशी मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे आणि यांच्या चित्रपटांमुळेच तग धरून आहे याची जाणीव इतरांना करून देताना स्वतःची अक्कल पाजळत असतात".
महेश टिळेकरांनी पुढे लिहिले आहे,"काही दिवसांपूर्वी याच टोळीतील काही कलाकारांचा एक सिनेमा प्रदर्शित झाला मी थिएटर मध्ये जाऊनच प्रत्येक मराठी सिनेमा पाहत असल्यामुळे तो नवीन प्रदर्शित झालेला सिनेमा पहायला गेलो तर शो कॅन्सल झालेला, दुसऱ्या दिवशी आणखी एका थिएटर वर पोचलो तिथेही तीच अवस्था. शेवटी भांडून दोन तिकिटं काढून मित्रा बरोबर सिनेमा पाहिला. थिएटर मध्ये एकूण सातजणच होते. पुरस्कार सोहळे, टिव्ही चॅनेलवरील रियालिटी शो मध्ये स्वतः च्या नावाचा स्टार, सुपरस्टार म्हणून गवगवा करणारे आणि कामासाठी भरपूर पैसे घेणारे हे स्टार स्वतः अभिनय केलेल्या सिनेमासाठी प्रेक्षक थिएटर पर्यंत आणण्याचा करिश्मा दाखवू शकत नाही याचे दुःख झाले पण प्रेस, मीडिया समोर बोलताना त्या सिनेमातील आणि सिनेमा पहायला स्टायलिश कपडे घालून आलेले हे ठराविक ग्रुप मधील कलाकार एकमेकांची अशी काही तळी उचलत होते, उदो उदो करीत होते की राजदरबारी असणारे भाट पण कमी पडतील. आमचा चित्रपट मानवी भावनांचे कंगोरे दाखवणारा, संवेदनशील मनाला आर्त साद घालणारा ...बोलताना असे साजूक तुपातील, पुस्तकी शब्द वापरून मध्येच त्याला इंग्रजीचा तडका देऊन मिडीयाला बाईट देताना हे नाटकी बोलणारे काही स्टार पाहिल्यावर हसावं की रडावे असं झालं माझं".
पोस्टच्या शेवटी त्यांनी एक टीप देखील दिली आहे. त्यांनी लिहिले आहे,"वरील माझे मत सरसकट चित्रपट सृष्टीतील सर्वच कलाकारांच्या बाबतीत नाही".
संबंधित बातम्या
'कश्मीर फाइल्स' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका
Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड
Kaun Pravin Tambe : 'कौन प्रवीण तांबे' सिनेमात मराठमोळा श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha