'कश्मीर फाइल्स' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका
'कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्तीसमोर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे.
मुंबई: काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित 'कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विवय जोशी यांच्या खंडपीठासमोर ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी सादर करण्यात आली, त्याची दखल घेत मंगळवारी यावर तातडीनं सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
'कश्मीर फाइल्स' हा चित्रपट साल 1989 आणि 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर थेट भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे मात्र त्यावर आक्षेप घेत उत्तर प्रदेशचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित असल्याचं भासत आहे. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे.
संपूर्ण चित्रपटात त्या काळात घडलेल्या घटनांवर एकतर्फी भाष्य करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे हिंदू समुदायाची माथी भडकू शकतात आणि देशभरात हिंसाचार घडू शकतो. सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका आणि निकाल होत असताना, राजकीय पक्षांकडून या मुद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वत्र जातीय हिंसाचारात वाढू शकतो. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची तसेच याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर त्वरित सगळीकडून हटवून टाकावा, अशी विनंती याचिकाकर्त्याकडून करण्यात आली आहे.
या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकेची दखल घेत खंडपीठाने मंगळवारी तातडीने सुनावणी निश्चित केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी 'काश्मीर फाइल्स'चम दिग्दर्शन केलं असून त्यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. येत्या शुक्रवारी 11 मार्चला चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले, अश्रू अनावर
- Movies releasing in March : अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'पासून प्रभासच्या 'राधे श्याम'पर्यंत 'हे' सिनेमे मार्चमध्ये होणार प्रदर्शित
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित