Chinmay Mandlekar : शिवरायांचा गेटअप केल्यानंतर सेल्फी देण्यास चिन्मय मांडलेकर नकार देतो; म्हणाला...
Chinmay Mandlekar : छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना अभिनेता चिन्मय मांडलेकर काही नियम पाळतो.
Chinmay Mandlekar On Subhedar : 'सुभेदार' (Subhedar) हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमात अभिनेता चिन्यम मांडलेकरने (Chinmay Mandlekar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची भूमिका साकारली आहे. शिवरायांची भूमिका साकारताना अभिनेता काही नियम पाळतो. चिन्मय म्हणाला,"शिवरायांच्या गेटअपमध्ये असताना सेल्फी देण्यास मी नकार देतो".
एबीपी माझाशी बोलताना चिन्मय मांडलेकर म्हणतो,"शिवरायांच्या पूर्ण गेटअपमध्ये असताना सेल्फी देणं मी टाळतो. अगदी मुहूर्तादरम्यान फोटो काढायचा असेल तर जिरेटोप काढून ठेवतो. एक अभिनेता म्हणून आजपर्यंत कोणालाही सेल्फी देण्यास मी नकार दिलेला नाही. पण शिवरायांचा पूर्ण गेटअप अंगावर चढला की ते रूप प्रतिमा ही शिवरायांची आहे. त्यामुळे फोटो देण्यास मी स्पष्ट नकार देतो".
'सुभेदार'सारख्या सिनेमांवर टीका का होत नाही?
'सुभेदार' सारख्या शिवराज अष्टकातील सिनेमांवर टीका होत नाही. याबद्दल बोलताना चिन्मय मांडलेकर म्हणाला,"
मी इतरांच्या सिनेमाबद्दल किंवा ते कोणत्या हेतूने सिनेमा करतात हे मला खरच माहिती नाही. तुम्ही जेव्हा ऐतिहासिक व्यक्तींवर सिनेमा बनवता तेव्हा त्या व्यक्तींबद्दल आदर असायला हवा. मग तुमच्या सिनेमाचा दर्जा कमी असेल किंवा तांत्रिकदृष्ट्या काही चुकलं तर कदाचीत लोक माफ करतील. पण तुमचा त्या व्यक्तींमध्ये असलेल्या आदरात जर कमी असली तर लोक तुम्हाला माफ करत नाहीत".
चिन्मय पुढे म्हणाला,"मला असं वाटतं की,दिग्पालला 'फर्जंद' या त्याच्या पहिल्या सिनेमापासून ही गोष्ट कळली आहे. त्याचा शिवराय, जिजाऊ, स्वराज्य आणि मावळ्यांविषयीचा आदर हा त्याच्या प्रत्येक सिनेमात ओतप्रोत दिसतो आहे. याच कारणाने शिवराज अष्टकातल्या सिनेमांवर लोकांनी आजवर टीका केलेली नाही".
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा असतानाही 'सुभेदार' सिनेमा पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. आता या सिनेमाने चौथ्या आठवड्यात यशस्वी प्रवेश केला आहे. या सिनेमाच्या यशाबद्दल बोलताना चिन्मय मांडलेकर म्हणाला,"सुभेदार' सिनेमाला मिळणारं यश पाहून नक्कीच आनंद होत आहे. चांगला सिनेमा असेल तर प्रेक्षक त्या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
'सुभेदार'चा यशस्वी चौथा आठवडा!
'सुभेदार' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांचे कल्याणकारी कार्य प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकरसह मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, विराजस कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या