Pathaan: 'पठाण' चित्रपटातील काही भाग आणि गाणं बदला; सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांची सूचना
पठाण (Pathaan) चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली आहे.
Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली आहे. संबंधित बदल करुन सेन्सॉर बोर्ड समोर हा चित्रपट सादर करावा, असं प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांनी सांगितलं आहे.
प्रसून जोशी यांनी एबीपी न्यूजला दिली माहिती
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी एबीपी न्यूजला याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं , 'हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी पोहोचला. CBFC मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपट परीक्षण प्रक्रियेतून गेला. समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात सुचवलेले बदल अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाची सुधारित आवृत्ती सादर करण्याचे मार्गदर्शन देखील समितीनं केले आहे. CBFC नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता यांच्यातील योग्य संतुलन राखण्यासाठी वचनबद्ध आहे. आपली संस्कृती आणि श्रद्धा यांचा विचार प्रत्येकानं करावा आणि सावधगिरी बाळगावी. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास महत्वाचा आहे. निर्मात्यांनी त्या दिशेने कार्य करत राहिले पाहिजे.'
काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले. हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकले. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: