Jacqueline Fernandez वर ईडीची मोठी कारवाई, 7 कोटींची संपत्ती जप्त, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Jacqueline Fernandez : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिन फर्नांडिसची सात कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिनची 7 कोटी 12 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.
तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडलं गेलं होतं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय 15 लाख रुपये भावाला दिले.
जॅकलिनने जबाबात काय म्हटलं होतं?
ईडीने तपासादरम्यान जॅकलिनचे जबाब नोंदवले होते. त्याचवेळी जॅकलिनने ईडीला सांगितलं होतं की सुकेशने माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि मला लाखो रुपयांच्या घोड्यासह महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याशिवाय सुकेशने जॅकलिनच्या आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्चही उचलला होता.
जॅकलिन आणि सुकेशचे अनेक फोटोही समोर आले होते. सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. तपासादरम्यान, ईडीला सुकेशने जॅकलिनला दिलेली सुमारे 7 कोटी रुपयांची मालमत्ता ही गुन्ह्यातून कमावलेली मालमत्ता असल्याचं आढळून आले. यानंतर कारवाई करत ईडीने जॅकलिनच्या या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
आरोपपत्रात ईडीने केलेला दावा
गेल्या वर्षी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात दावा करण्यात आला होता की, "30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर रोजी जॅकलीन फर्नांडिसचे जबाब नोंदवण्यात आले होते, ज्यामध्ये तिने गुच्ची आणि चॅनेलच्या तीन डिझायनर बॅग्ज, दोन गुच्ची जिम आऊटफिट्स, लुई व्हिटॉन शूज, हिऱ्याच्या कानातल्यांच्या दोन जोड्या आणि बहुरंगी मौल्यवान खड्यांचे ब्रेसलेट आणि दोन हर्म्स ब्रेसलेट भेट म्हणून मिळाल्याचे म्हटलं होतं. याशिवाय, तिला'मिनी कूपर' कार देखील मिळाली होती, जी तिने परत केली, असा दावा ईडीने केला. चंद्रशेखरने डिसेंबर 2020 मध्ये अभिनेत्री नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आणि नंतर इतर महागड्या भेटवस्तूंव्यतिरिक्त 75 लाख रुपये दिले