बॉलिवूड अभिनेते फराज खान यांचं निधन; वयाच्या 46व्या वर्षी अखेरचा श्वास
बॉलिवूड अभिनेता फराज खान यांचं निधन झालं आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अखेर वयाच्या 46व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते फराज खान यांचं निधन झालं आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. फराज खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, त्यांना खरी ओळख राणी मुखर्जीसोबतच्या मेहंदी या चित्रपटामुळे मिळाली होती.
With a heavy heart I break the news that #FaraazKhan has left us for what I believe, is a better place.Gratitude to all for your help & good wishes when he needed it most.Please keep his family in your thoughts & prayers.The void he has left behind will be impossible to fill ????
— Pooja Bhatt (@PoojaB1972) November 4, 2020
अभिनेते फराज खान यांच्या निधनाचं वृत्त अभिनेत्री-निर्माती पूजा भट्ट यांनी दिली होती. पूजा भट्टनेच त्यांना झालेल्या ब्रेन इन्फेक्शनचीही माहिती शेअर केली होती. फराज खान यांच्या निधनाचं वृत्त शेअर करत पूजा भट्ट यांनी ट्वीट केलं की, 'तुम्हा सर्वांना मला हे सांगताना दु:ख होत आहे की, अभिनेता फराज खान यांचे निधन झाले आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.'
दरम्यान, काही दिवसांपूर्वी फराज खानचा भाऊ फहमान खानने फराज खान यांच्या प्रकृती अस्वास्थाबाबत माहिती दिली होती. तसेच आर्थिक मदत करण्याचं आवाहनही केलं होतं. फहमान खान यांनी आवाहन केल्यानंतर अभिनेता सलमान खानने फराज यांच्या उपचारांसाठी मदत केली होती.
फराज खान यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आलं होतं की, 'फराजला विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे त्याच्यावर ब्रेन इन्फेक्शनवर उपचार सुरु करण्यात आले होते. ब्रेन इन्फेक्शनमुळे फराज यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना न्युमोनियाही झाला होता.'
दरम्यान, फराज खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1996 मध्ये 'फरेब' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनंतर त्यांनी 'चाँद बुझ गया' , 'दुल्हन बनू में तेरी', 'पृथ्वी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 'मेहंदी' या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत काम केलं. याच चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. शिवाय 'वन प्लस वन', 'शूsssss कोई है', 'रात होने को है', 'करिना करिना' यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केलं होतं.