Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; जाणून घ्या 15 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा रिलीजच्या दोन आठवड्यांनंतरही चांगलीच कमाई करत आहे.
Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा सर्वत्र बोलबाला आहे. महिलांनी हा सिनेमा डोक्यावर उचलून धरला आहे. नावाप्रमाणेच 'बाईपण हे भारी' आहे हे या सिनेमाने दाखवून दिलं आहे. रिलीजच्या दोन आठवड्यांनंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे.
'बाईपण भारी देवा' या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. सिनेमाचं दिग्दर्शन, कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. महिला प्रेक्षकांना हा सिनेमा भावल्याचं पाहायला मिळत आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कार्यक्रम आणि कलाकृती महिलांनी डोक्यावर उचलून धरले आहेत. होम मिनिस्टर, माहेरची साडी, चिमणी पाखरं या सिनेमांच्या यादीत आता 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा समावेश झाला आहे.
'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection Day 15)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या 15 दिवसांत 39.95 कोटींची कमाई केली आहे.
- पहिला दिवस : 1.05 कोटी
- दुसरा दिवस : 2.3 कोटी
- तिसरा दिवस : 3.2 कोटी
- चौथा दिवस : 1 कोटी
- पाचवा दिवस : 1.45 कोटी
- सहावा दिवस : 1.08 कोटी
- सातवा दिवस : 1.06 कोटी
- आठवा दिवस : 2.35 कोटी
- नववा दिवस : 5.04 कोटी
- दहावा दिवस : 6.05
- अकरावा दिवस : 2.78 कोटी
- बारावा दिवस : 2.88 कोटी
- तेरावा दिवस : 2.70 कोटी
- चौदावा दिवस : 2.79 कोटी
- पंधरावा दिवस : 2.60 कोटी
- एकूण कमाई : 39.95 कोटी
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीज आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून 'बाईपण भारी देवा' सिनेमानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.
'बाईपण भारी देवा' या सिनेमात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. सिनेमातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदेंच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी सिनेमाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसून आलं.
चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी थिएटरमधील गर्दी ओसरलेली दिसत नाही. सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकवर्गाकडून मिळणारी प्रसिद्धी पाहता तिसऱ्या आठवड्यातही आपली हुकमत कायम ठेवत , हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपलं नाणं खणखणीत वाजविण्यात यशस्वी झालाय असं चित्र पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या