Salman Khan : सलमान खानला धमकी देणारा एक आरोपी अटकेत, वांद्र्यातून मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Salman Khan : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी धमकी आली होती. सलमानला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणात एका आरोपीला मुंबई पोलिसांनी वांद्र्यातून अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईच्या पोलिस कंट्रोल रुमला मेसेज करत सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी या आरोपीने जर दोन कोटी रुपये दिले नाही तर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान सध्या सलमानच्याही सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात 354 (2), 308(4) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशीही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने पैशाची मागणी केली होती.
भाईजानला धमक्या मिळण्याचं सत्र सुरुच
अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. 1998 मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमानच्या घरावर या वर्षी एप्रिल महिन्यात गोळीबारही झाला होता. यानंतर दसऱ्याच्या दिवशी सलमानच्या जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. या टोळीकडून धमक्या मिळण्याचं सत्र सुरुच आहे.