Raju shrivastav : अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांना पाठवले खास गिफ्ट, कुटुंबाने मानले आभार!
Raju shrivastav : हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे रुग्णालयात असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा झाली आहे.
Raju shrivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju shrivastav) सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई लढत आहेत. हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे रुग्णालयात असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा झाली आहे. मात्र, अद्याप त्यांना शुद्ध आलेली नाही. त्यांना शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारही राजू श्रीवास्तव यांना लवकर बरे वाटावे म्हणून त्यांना शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही त्यांच्यासाठी काहीतरी खास पाठवले आहे.
अमिताभ बच्चन यांनी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना काही मेसेज पाठवले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्या फोनवर मेसेज पाठवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन पहिल्या दिवसापासून राजू यांना मेसेज पाठवत होते. पण, राजू यांचा फोन बंद असल्याने कुटुंबीयांना हे मेसेज पाहता आले नाहीत.
डॉक्टरांचा सल्ला
एम्सच्या डॉक्टरांनी राजू यांच्या कुटुंबीयांना सांगितले की, त्यांना अशा एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकवा, ज्यांना ते आदर्श मानतात किंवा तो आवाज त्यांना आशय प्रिय आहे. यामुळे त्यांची तब्येत सुधारण्यास मदत होऊ शकते. डॉक्टरांचा हा सल्ला ऐकून कुटुंबीयांना लगेच अमिताभ बच्चन यांचे नाव डोळ्यासमोर आले. त्यांनी लगेच अमिताभ बच्चन यांच्या ऑफिसमध्ये फोन लावला. तेव्हा, त्यांना सांगितले गेले की, अमिताभ बच्चन केव्हापासून त्यांना मेसेज करत आहेत, त्यांनी फोन ऑन करून पाहावा.
राजू यांचा बंद फोन सुरु केल्यावर कुटुंबीयांना ते मेसेज पाहिले. यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे विनंती केली की, त्यांनी त्यांचे मेसेज रेकॉर्ड करून पाठवले तर ते राजू यांना ऐव्कू शकतील. राजू यांच्या कुटुंबाची ही विनंती ऐकून अमिताभ बच्चन यांनी देखील तातडीने आपल्या शुभेच्छा रेकॉर्ड करून त्यांना पाठवल्या.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृतीत सुधारणा
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र अलीकडेच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे माहिती समोर आली आहे.
एबीपीला मिळालेल्या अपडेटनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. राजू आता उपचारांना प्रतिसाद देत असून, त्यांना नळीद्वारे लिक्विड देण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉमेडियनला शुद्धीवर येण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
महत्वाच्या बातम्या :