एक्स्प्लोर
'ती'ने 'माहेरची साडी'चा सीक्वेल करावा : अलका कुबल
माहेरची साडीच्या सीक्वेलची बातमी अलका कुबल यांनी सगळ्यात आधी पाहिली ती एबीपी माझावरच.
मुंबई : मराठी प्रेक्षकांच्या विशेषत: महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'माहेरची साडी' या अजरामर सिनेमाच्या सीक्वेलची नुकतीच घोषणा करण्यात आली. नव्वदच्या दशकात आलेल्या माहेरच्या साडी चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि कमाईचा उच्चांक गाठला होताच पण अलका कुबल यांनाही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं
पण या नव्या माहेरची साडीला कोण योग्य न्याय देऊ शकेल असं जेव्हा अलका कुबल यांना विचारलं, तेव्हा त्यांची पसंती मिळाली चक्क अमृता खानविलकरला. होय, 'वाजले की बारा' फेम अमृता खानविलकर
अलका कुबल यांचं हे उत्तर नक्कीच भुवया उंचावणारं आहे. पण अमृताने ही भूमिका का करावी याचं कारणही अलका कुबल यांनी सांगितलं. बाजी सिनेमातील अमृताचं काम मला फार आवडलं होतं. मेकअप नसलेला तिचा लूक फार छान होता. तिने ही भूमिका सहजरित्या साकारली होती, त्यामुळे माहेरची साडीसाठी अमृताच योग्य आहे, असं अलका कुबल म्हणाल्या.
आता ही जबाबदारी अलका कुबल यांनी अमृतावर टाकलीय खरी, पण ती हे आव्हान पेलण्यासाठी कितपत तयार आहे हे जेव्हा अमृताला विचारलं, तेव्हा मात्र ती म्हणाली की, "अलकाताईंचा माहेरची साडी हा चित्रपट माझे आई, बाबा, आजी, मी रडत रडत पाहिला आहे. सगळ्यांनाच तो चित्रपट फार आवडला होता. शिवाय बाजी मधली माझं काम त्यांना आवडलं. माहेरची साडीसाठी त्यांनी माझं नाव घेतलं ह्यामुळे मला फारच छान वाटतंय."
माहेरची साडीच्या सीक्वेलची बातमी अलका कुबल यांनी सगळ्यात आधी पाहिली ती एबीपी माझावरच. सीक्वेलच्या बातमीने त्या कमालीच्या खूश आहेत. इतकंच नाही तर ऑफर मिळाली तर आपल्यालाही काम करायला आवडेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
खरंतर माहेरची साडी न पाहिलेला प्रेक्षक महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. या सिनेमाने महाराष्ट्राची चित्रपटगृहं अक्षरश: दणाणून सोडली. कमाईचे नवे विक्रम रचले. पैठणीपेक्षाही माहेरच्या साडीने तमाम महिलांना वेड लावलं होतं. त्यामुळे या अजरामर कलाकृतीचा सीक्वेल कसा असेल याची सगळ्यानाच उत्सुकता आहे.
अलका कुबल यांनी ही साडी अमृताला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. पण सध्याच्या स्पर्धेत ही साडी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement