(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Success Story : 15 सुपरहिट सिनेमे; लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री अन् UPSC कडे वळवला मोर्चा; अभिनेत्री आज आहे IAS ऑफिसर
Actress Turns To IAS Officer : एकेकाळी मनोरंजनसृष्टी गाजवलेली अभिनेत्री आज IAS ऑफिसर आहे.
Actress Keerthana Turned IAS Officer : अनेक अभिनेते-अभिनेत्री मालिकांमध्ये, सिनेमांत आयएएस (IAS) किंवा आयपीएस अधिकारीच्या (IPS) भूमिकेत दिसतात. पण खऱ्या आयुष्यात एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आयएएस किंवा आयपीएस झाल्याचं फार क्वचितच ऐकलं असेल. पण एका अभिनेत्रीने मात्र हे सत्यात उतरवून स्वत:चं स्वप्न साकार केलं आहे. बालकलाकार म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर अभिनेत्रीने सिनेसृष्टीला रामराम करत आपला मोर्चा यूपीएससीकडे (UPSC) वळवला. तिच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण मेहनतीच्या जोरावर तिने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
पाच वेळा अपयश अन्...
दाक्षिणात्य अभिनेत्री एचएस कीर्तना (HS Keerthana) आज यूपीएससीची परीक्षा पास करुन IAS अधिकारी बनली आहे. अभिनेत्री असण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण अभिनेत्री असलेल्या कीर्तनाने मात्र दरवर्षी हजारो विद्यार्थी पाहत असलेलं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकारही केलं. अभिनेत्रीने सलग पाचवेळा यूपीएससीची (UPSC) परीक्षा दिली. सलग पाचवेळा अपयश आल्यानंतरही तिने हार मानली नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सहाव्या प्रयत्नांत मात्र तिने मोठं यश मिळवलं. आज कीर्तना अभिनेत्री नव्हे तर आयएसएस अधिकारी म्हणून ओळखली जाते.
अभिनेत्री एचएस कीर्तनाने (Keerthana) सहाव्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची पहिली पोस्टिंग कर्नाटकातील (Karnatak) मंड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून करण्यात आली होती. कीर्तनाने गंगा-यमुना, सर्कल, इंस्पेक्टर, लेडी कमिश्नर, मुदिना आलिया, उपेन्द्र, ए, हब्बा, डोरे, ओ मल्लिगे, जननी, पुतानी आणि चिगुरु सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच कन्नड मनोरंजनसृष्टीतील 15 सुपरहिट सिनेमांचा ती भाग आहे.
कीर्तना 2011 मध्ये पहिल्यांदा कर्नाटक प्रशासकीय सेवा (KPSC) परीक्षेला बसली होती. चांगल्या गुणांनी ही परीक्षा तिने उत्तीर्ण केली. त्यानंतर दोन वर्षे केएसएस अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर तिने खऱ्या अर्थाने UPSC परीक्षेकडे आपला मोर्चा वळवला. 2013 मध्ये तिने पहिल्यांदा UPSC CSE ही परीक्षा दिली. त्यानंतर पाच प्रयत्नांनंतर तिला 2020 मध्ये यूपीएससीमध्ये यश मिळालं. 167 रँकसह ती आयएसएस अधिकारी (IAS Officer) झाली. कीर्तनाचा बाल-कलाकार ते IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पण तरी अनेक अडथळे आणि अपयशाचा सामना करत तिने यश मिळवलं. UPSC स्पर्धा परीक्षा ही देशातली सर्वात मोठी परीक्षा मानली जाते. अभिनेत्रीने ही परीक्षादेखील उत्तीर्ण करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
संबंधित बातम्या