Bollywood latest News : रस्त्यावर भीक मागायचा, आमिर खानच्या चित्रपटातील 5 सेकंदाच्या सीनने बदलले आयुष्य
Bollywood latest News : पीके चित्रपटातील एका पाच सेकंदाच्या रोलने रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्याचे आयुष्य बदलले.
Bollywood latest News : सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेकांच्या कारकीर्दीची सुरुवात ही छोट्या-मोठ्या कामांनी झालेली आहे. सुपरस्टार रजनीकांत हे एकेकाळी बस कंडक्टर होते. जॅकी श्रॉफदेखील चाळीत राहायचे. पोटाची आग भागवण्यासाठी चित्रपटात अवघ्या 5 सेकंदाचा सीन करणाऱ्या एका भिकाऱ्याचे आयुष्य बदलले. आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट पीकेमध्ये भिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या मनोज रॉयचे आयुष्य बदलले.
पोटाची खळगी भागवण्यासाठी मागायचा भीक
उत्तर-मध्य आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील बेडेती येथील रहिवासी असलेला मनोज रॉय हा रोजंदारी करणाऱ्या मजुराचा मुलगा आहे. मनोजच्या जन्मानंतर लगेचच त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याने त्याची आई गमावली होती. पुढे त्यांचे रोजंदारीवर काम करणारे वडीलही आजारी पडले आणि घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली. यानंतर मनोजने शाळा सोडली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भीक मागू लागला. नंतर मनोज नोकरीच्या शोधात दिल्लीला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला. मात्र, येथेही मनोजने हातात भिकेचा कटोरा घेऊन आंधळ्यासारखे वागत भीक मागायला सुरुवात केली.
मनोजने एकदा हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली परिस्थिती सांगितली. मनोजने सांगितले की, मी दिल्लीतील जंतर-मंतरवर भीक मागत असे. याच दरम्यान दोन व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि मला अॅक्टिंग करशील का, असे विचारले. त्यावर मी त्यांना दोन वेळचे पोट भरण्यासाठी मी अंध असल्याचा अभिनय करतो असे सांगितले. त्यांनी मला एक फोन नंबर आणि 20 रुपयांची नोट दिली.
'पीके' साठी दिले ऑडिशन
त्यानंतर मनोजला नेहरू स्टेडियममध्ये ऑडिशनसाठी बोलावण्यात आले आणि त्याने आमिर खानच्या 'पीके' चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी इतर सात भिकाऱ्यांना मागे टाकले. त्याने सांगितले की, "दुसऱ्याच दिवशी मी गेलो आणि माझी ऑडिशन घेतली गेली. माझ्यासोबत इतर सातजण होते. माझ्यासाठी चित्रपटासाठी निवड होणे हे महत्त्वाचे नव्हते तर सात दिवस मला जेवण मिळणे हे महत्त्वाचे होते.
पीके चित्रपटात पाच सेकंदाचा रोल
मनोज रॉयला राजकुमार हिरानी यांच्या आमिर खानची भूमिका असलेल्या पीके चित्रपटात 5 सेकंदाची भूमिका साकारली होती. त्यात त्याने अंध भिकाऱ्याची व्यक्तीरेखा साकारली होती. आमिर खान येऊन त्याच्या कटोऱ्यातून पैसे काढेपर्यंत त्याला काठीचा आधार घ्यावा लागला.
या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत इतर कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. 'पीके' ब्लॉकबस्टर ठरला, या चित्रपटाने जगभरात 722 कोटींची कमाई केली.
पाच सेकंदाच्या भूमिकेने बदलले नशीब
मनोज रॉयने सांगितले की, 'पीके' चित्रपटातून कमावलेल्या पैशातून मी माझ्या गावी परतलो. आता मला एक नोकरीदेखील नाही. आता फेसबुक अकाउंटही आहे आणि प्रेयसीदेखील असल्याचे त्याने सांगितले.