'मन्नत'च्या नुतनीकरणावेळी नियमांचं उल्लंघनाचा आरोप, पण भाजपच्या बड्या नेत्याचा शाहरुख खानला सपोर्ट
BJP leader supports Shah Rukh Khan : 'मन्नत'च्या नुतनीकरणावेळी नियमांचं उल्लंघनाचा आरोप, पण भाजपचा बडा नेता शाहरुख खानला सपोर्ट करण्यासाठी मैदानात

BJP leader supports Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईच्या बांद्रा बँडस्टँड परिसरातील समुद्रकिनारी असलेला हा बंगला गेल्या चार महिन्यांपासून नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहे. या संदर्भात कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप शाहरुख खानवर करण्यात आला आहे.
काही सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी यासंदर्भात आक्षेप नोंदवत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि वन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर BMC आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मन्नत’ या बंगल्यावर पोहोचून तपासणी केली.
आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
या घटनेवर महाराष्ट्र सरकारचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी BMC आणि वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "शाहरुख खानच्या घरात जाण्याची गरज काय होती? त्या बंगल्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाण्याचं काही कारणच नव्हतं. काही चूक असेल तर जबाबदारी घेतली जाईल, पण कोणालाही विनाकारण त्रास देणं योग्य नाही.", असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले, "शाहरुख खान असो किंवा कोणी दुसरा – मुंबई आणि महाराष्ट्रात कोणालाही विनाकारण त्रास दिला जाऊ शकत नाही. मी याबाबत सविस्तर माहिती घेत आहे."
सध्या ‘मन्नत’ बंगल्याचं नूतनीकरण सुरू असून शाहरुख खान आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांनी जॅकी भगनानी यांच्या अपार्टमेंटमध्ये तात्पुरते वास्तव्य केलं आहे.
शाहरुख खानच्या मॅनेजरची प्रतिक्रिया
या प्रकरणावर शाहरुख खान यांची मॅनेजर पूजा ददलानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की,"मन्नतच्या नूतनीकरणासंदर्भात कोणतीही तक्रार नाही. सर्व कामे नियमानुसारच सुरू आहेत."
त्याच वेळी वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने मात्र असा दावा केला की,"आम्हाला नूतनीकरणाच्या परवानगीसंदर्भात तक्रार मिळाली होती. त्यानंतर आमची टीम ‘मन्नत’वर तपासणीसाठी गेली. आता त्या तपासावर आधारित एक अहवाल तयार करण्यात येत असून, तो लवकरच सादर केला जाईल."
इतर महत्त्वाच्या बातम्या
Brain AVM सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतोय अभिनेता सलमान खान, कपिल शर्माच्या शोमध्ये केला मोठा खुलासा



















