प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अवलिया, 'मोहन प्यारे'ची मनाला चटका लावणारी एक्झिट, अतुल परचुरेंच्या अभिनयाचा 'तेजस्वी' प्रवास
Atul Parchure Death : अतुल परचुरे यांनी मालिका, सिनेमे आणि रंगभूमीवर अशा तिन्ही माध्यमांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
Atul Parchure Death : रंगभूमीवरचा प्रवेश, मालिकांमधल्या हळव्या भूमिका अन् सिनेमांमधलं अचूक टायमिंग साधत अतुल परचुरे (Atul Parchure) हे नाव कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं. त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेम केलंय. नाटक आणि अतुल परचुरे हा कलाकारांचा फार जिव्हाळ्याचा विषय. कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क ते अगदी व्यक्ती आणि वल्लीपर्यंत त्यांची प्रत्येक भूमिका रंगभूमीवर अगदी खणखणीत वाजली.
बालकलाकार म्हणून अभिनयाच्या कारकिर्दीला अतुल परचुरे यांनी सुरुवात केली. अशोक सराफ यांच्या खिचडी या सिनेमात त्यांनी अशोक सराफांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तेव्हापासून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मराठी सिनेसृष्टीला हसवणारा एक तेजस्वी तारा गवसला.
अतुल परचुरे यांचा सिनेप्रवास
अतुल परचुरे यांनी पु.ल.देशपांडे यांची व्यक्ती आणि वल्ली या नाटकातून अगदी हुबेहुब भूमिका साकारली होती. पण त्याची खरी झाली होती ती, नातीगोती या नाटकामुळे. या नाटकात त्यांनी दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू यांच्यासोबत रंगभूमी गाजवली होती. 'वासूची सासु', 'प्रियतमा', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकांमधल्याही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
सलाम-ए-इश्क', 'पार्टनर', 'ऑल द बेस्ट: फन बिगिन्स', 'खट्टा मीठा', 'बुढ्ढा होगा तेरा बाप' या हिंदी सिनेमांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकतच त्यांचा अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच त्यांनी होणार सून मी ह्या घरची, भागो मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे, माझा होशील ना या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची मोहन प्यारे ही भूमिका तर अगदी लहान मुलांपासून सर्वांना भावली. अशा अभिनयाच्या तेजस्वी ताऱ्याने जगाचा निरोप घेतल्याने मराठी सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.
अतुल परचुरे यांचं निधन
मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आलेली आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.