Atul Parchure Death : 'अलविदा अतुल...,' अतुल परचुरेंसोबतचे किस्से केले शेअर; किरण मानेंची भावुक पोस्ट
Atul Parchure Death : अतुल परचुरेंच्या निधनानंतर किरण माने यांनी प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

Kiran Mane reaction on Atul Parchure death : अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं सोमवार (15) ऑक्टोबर रोजी कर्करोगाने निधन झालं. अनेक महिन्यांपासून अतुल परचुरे कर्करोगाशी झुंजत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय. एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याचं दु:ख कलाकारांकडून व्यक्त केलं जातंय. अभिनेते किरण माने यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
अतुल परचुरे यांच्या जाण्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच त्यांच्या अत्यंदर्शनालाही संपूर्ण कलासृष्टी हजर होती. यावेळी कलाकारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. किरण माने यांनही अतुल परचुरे यांच्यासाठी पोस्ट करत त्यांच्या मैत्रीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
किरण माने यांनी काय म्हटलं?
किरण माने यांनी पोस्ट करत म्हटलं की, ...माझी आणि अतुल परचुरेची खुप मैत्री वगैरे नव्हती. एकमेकांची नाटके बघणे आणि प्रयोगानंतर थोडी चर्चा करणे या व्यतिरिक्त फार संबंध आला नाही. ...पण दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आमचं एकमेकांशी दोन-तीन वेळा फोनवर बोलणं झालं. जे बोलणं झालं ते खुप महत्त्वाचं होतं. गंभीर विषयांवर होतं. प्रस्थापितांशी बोलताना मी थोडा सावध असतो. माझ्याविषयी कुणाचा कुणी काय गैरसमज करून दिलेला आहे, ते माहिती नसतं... पण अतुल पहिल्या फोनमध्येच अगदी जुनी मैत्री असल्यासारखं भरभरुन बोलला.
पुढे त्यांनी म्हटलं की, समोरच्या माणसाच्या मनात आपल्याविषयी अढी आहे, हे मला पटकन जाणवतं... तशा व्हाईब्ज अतुलकडून मला अजिबात आल्या नाहीत. उलट बोलण्यात आपुलकी होती. ज्या विषयांसाठी फोन झाला, त्यासंदर्भात हातचे न राखता माहिती दिली. ज्या माहितीचा मला प्रचंड उपयोग झाला. 'माणूस' म्हणून हा लाखात एक आहे हे जाणवले...चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... खचल्यासारखं होतं...अलविदा अतुल...
कर्करोगाचे कारण झाले..
अतुल परचुरे यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यावर ते जिद्दीने मातही करत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी रात्री कर्करोगाच्या कारणानेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या चाहत्यांसह कलाकारांच्या ही मनाला चटका लावून देणारी ही बातमी ठरली.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
