(Source: ECI/ABP News/ABP Majha)
QnA : 'धुमधडाका'मध्ये 'वक्ख्या विक्खी वुख्खू' कसा सुचला? अशोक सराफांनी उत्तर सांगितलं अन् हशा पिकला
'मी बहुरूपी' या आत्मकथनाच्या निमित्ताने अशोक सराफांची मुलाखत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पुण्यात घेतली. यावेळी त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले. तसेच वेगळवेगळ्या उत्तरांनी धमाल उडवून दिली.
Ashok Saraf Marathi Film : मराठीसह हिंदी भाषिक सिनेमा, नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कित्येक भूमिका आपल्या लक्षात असतील. 'मी बहुरूपी' या आत्मकथनाच्या निमित्ताने अशोक सराफांची मुलाखत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पुण्यात घेतली. यावेळी त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले. तसेच वेगळवेगळ्या उत्तरांनी धमाल उडवून दिली.
कोणी सांगितलंय का? की अभिनयाचं रीतसर शिक्षण घ्यावं लागतं. अभिनय हे शिक्षण घेऊन येतं, हे मी मानत नाही. कारण मुळात अभिनय हे अंगीकृत असायला लागतो. त्यामुळं अभिनय थेरोटीकली शिकवलं जाईल, पण ते प्रॅक्टिकली कसं करणार? हे शिकवता येतच नाही.
प्रयत्न केला होता म्हणजे प्रयत्न करून पाहिला होता. मी दहावी पास झालो होतो. तेव्हा पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट सुरू होतंय अशी जाहिरात आली होती. त्यात नमूद होतं की दहावी पास चालतं. माझ्यासाठी हीच बाब महत्वाची ठरली होती. मग मी माझ्या बाबांना ही जाहिरात दाखवली अन मी जाऊ का तिकडं असं म्हटलं. तेव्हा बाबांनी तो पेपर फाडला अन मुस्काडीत देईन असा दम भरला. नाटकं करतोय व्हय, तिथंच रिजेक्ट झालो.
मी सुनील गावसकर सोबत क्रिकेट खेळलोय आणि त्याने माझ्यासोबत गुरुदक्षिणा नाटकात काम केलं. त्यामुळे तो माझा बालमित्र आहे. गुरुदक्षिणा नाटकात तो कृष्ण आणि मी बलराम अशी भूमिका केली होती. आम्ही रेडिओ प्ले ही केलेत. तो त्यात ही चांगलं काम करायचा, फक्त माईक पर्यंत पोहचायला त्याला स्टूल द्यावा लागत होता. कालांतराने तो क्रिकेटकडे वळला अन् मी कलाकार झालो.
कॅरॅक्टरसोबत काम करायला हवं. नुसती स्टाईल मारून चालत नाही. हे मी अशोक कुमारांकडून शिकलो. लहानपणीच मी ही खुणगाठ बांधली. त्यांनी माझा 'एक डाव भुताचा' पाहिला होता. त्यांनी मला पाहताच क्षणी घट्ट मिठी मारली अन लाईफ के एंड तक तू काम करेगा. बिलकुल मेरे जैसा. असे त्यांचे उद्गार होते.
सिगार ओढताना घशाला त्रास झाला, अन् ठसका/खोकला आला. तो आवाज थोडा वेगळाच आला. मग त्याला जोडून 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हे जुळलं. हे काय ठरवून केलं नव्हतं. (याचा प्रसंग सांगताच सभागृहात एकच हशा पिकला)
1972 साली एक होता शिंपी पासून विनोदी अभिनयाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अन चित्रपटात डार्लिंग डार्लिंग मधून विनोदी अभिनय सुरू झाला असा म्हणता येईल.
अपयश हे येतंच, फक्त आत्मविश्वास वाया घालवू नका. पण यश पचवता आलं पाहिजे. अभिनयात नसतो तर मी तबला वादक झालो असतो.