'आमच्या कुटुंबाशी तिचा काही संबंध नाही...' सुनेच्या प्रतापनंतर 'आई कुठे काय करते' फेम अर्चना पाटकर यांचा खुलासा
अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे

Archana Patkar: गोरेगावमधील बांधकाम व्यवसायकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अर्चना पाटकर (Archana Patkar) यांच्या सुनेला हेमलता पाटकरला अटक करण्यात आली. खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना मुंबई पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं होतं. 'आई कुठे काय करते' मालिकेतील कांचन भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची ती सून असल्याने मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडाली. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. "माझा मुलगा हेमलता बाणेपासून 4 वर्षांपूर्वी विभक्त झालाय. घटस्फोटाची केस सुरू असल्याने आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही." असं अर्चना यांनी स्पष्ट केलंय.
अर्चना पाटकर यांची पोस्ट
बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन 10 कोटी रुपयांची खंडणी हेमलता पाटकर आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस यांना खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारत असताना मुंबईचा गुन्हे शाखेने अटक केली. यानंतर अर्चना पाटकर आणि हेमलता पाटकर यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यावरून अर्चना पाटकर यांनी पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.
" मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार. मी गेली 40 वर्षे या सीनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाचा माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणी बद्दल चर्चा होतेय. आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा चार वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झालाय. कोर्टात त्यांच्या डिव्होर्सची केस सुरू आहे, म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका. धन्यवाद. अर्चना पाटकर."
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
नोव्हेंबरमध्ये अंधेरी पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीदरम्यान लेझर लाईटच्या वापरावरून दोन महिलांचा आणि बिल्डरच्या मुलामध्ये वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीपर्यंत गेला. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी सुरुवातीला 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली, जी नंतर 5.5 कोटींवर आली. सततच्या दबावाला कंटाळून संबंधित बिल्डरने गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचत 23 डिसेंबर रोजी लोअर परळ परिसरात खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना हेमलता पाटकर (39) आणि अमरीना जव्हेरी या दोघींना रंगीहात अटक केली. दीड कोटी रुपयांची रक्कम घेताना त्यांना पकडण्यात आलं.























