Amar Deokar : नॅशनल अवार्ड विजेत्या मराठमोळ्या दिग्दर्शकाची हटके फिल्म; मराठीत असं पोस्टर पहिल्यांदाच बनलं असेल...
Amar Deokar : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ या चित्रपटाने विशेष यश मिळवले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर आता आणखी एक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.
Amar Deokar : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ (Mhorkya) या चित्रपटाने विशेष यश मिळवले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर (Amar Deokar) आता आणखी एक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकतीच त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मात्र, या हटके चित्रपटाची घोषणा करण्यासाठी देखील त्यांनी अशीच हटके शक्कल लढवली आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमधून आता प्रेक्षकांना अनेक गोष्टींचा उलगडा करायचा आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनी एक पोस्टर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. यात एक हत्यार दिसत आहे. सोबतच या पोस्टरमध्ये हत्याराच्या आजूबाजूला काही रक्ताचे ओघळ दिसत आहेत. या हत्यार आणि रक्ताच्या ओघळामागे एक नाव लपलेलं दिसत आहे. दडलेलं हे नावचं चित्रपटाचं नाव आहे. ‘शीर्षक काय असेल बरं..........? मित्रांनो... लवकरच... आपल्या सेवेत...’ असे कॅप्शन देत त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटाचे नाव ओळखायचे आहे.
पाहा पोस्ट :
‘म्होरक्या’ची राष्ट्रीय पुरस्कारांत बाजी
बार्शी सारख्या ग्रामीण भागातील अमर देवकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकली. या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत.
‘या’मुळेही चर्चेत!
गेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी देशातील अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंत्र्यांच्या हातून घेण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुरस्कार देणार हे कळल्यानंतर अनेक लोकांनी हे पुरस्कार त्यावेळी नाकारले होते. त्या सर्वांना भारत सरकारने पोस्टाने पुरस्कार पाठवून दिले होते. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी पुरस्कार न स्वीकारणाऱ्यांमध्ये अमर देवकर हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे देवकर यांचा ‘म्होरक्या’ हा पहिलाच चित्रपट असून, त्यांच्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार न स्वीकारल्याने त्यांना हे पुरस्कार अखेर पोस्टाने घरपोच मिळाले होते. यावेळी त्यांनी पोस्टमन राहुल पवार यांचा भरपोशाख देऊन सन्मान केला होता.
हेही वाचा :
Mhorkya | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता दिग्दर्शक झाला मनोरुग्ण?
आनंद शिंदेंचा नवा अंदाज, म्होरक्या चित्रपटासाठी पहिल्यांदाच गायलं रॅप