Sangeetha Sajith : दाक्षिणात्य गायिका संगीता साजिथ यांचं निधन, दिग्गजांनी केला शोक व्यक्त
Sangeetha Sajith : दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका संगीता साजिथ यांचे निधन झाले आहे.
Sangeetha Sajith : दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका संगीता साजिथ (Sangeetha Sajith) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्याळम, तामिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत त्यांनी 200 हून अधिक गाणी गायली आहेत. संगीता साजिथ यांचे रविवारी 22 मे रोजी तिरुवनंतपुरम इथे निधन झाले.
केरळच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील संगीता साजिथ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संगीता यांना किडनी संबंधित आजार झाला होता. त्यांच्या निधनावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. संगीता यांनी एसए चंद्रशेखर यांच्या 'नालैया थेरपू' या सिनेमाच्या माध्यमातून तामिळ पार्श्वगायनात पदार्पण केलं.
अनेक मळ्याळम गाण्यांनादेखील संगीता साजिथ यांनी आपला आवाज दिला आहे. गेल्या वर्षी त्यांनी पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'कुरुथी'चं थीम सॉन्ग गायलं होतं, जे जॅक बिजॉय यांनी संगीतबद्ध केलं होतं. 2020 मध्ये दिग्दर्शक सचीच्या अय्यप्पनम कोशियुमसाठी संगीता यांनी 'थलम पोयी' हे गाणंही गायलं आहे.
'मिस्टर रोमियो' सिनेमासाठी उस्ताद ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं त्यांचं 'थन्नेराई कधालिकुम' हे गाणं 1990 च्या मध्यात खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यालादेखील संगीता साजिथ यांनी आवाज दिला आहे. 'अम्बिली पूवत्तम पोन्नरुली' या मळ्याळम गाण्यालादेखील संगीता साजिथ यांनी आपला आवाज दिला आहे. 'आलारे गोविंदा' आणि ममूट्टीच्या पझहस्सी राजासाठी (2009) 'ओदथंडिल थलम कोट्टम' सारख्या गाण्यांनादेखील त्यांनी आवाज दिला आहे.
थायकॉड, तिरुअनंतपुरम येथील शांतिकावदम सार्वजनिक स्मशानभूमीत संगीत साजिथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पृथ्वीराज स्टार कुरुथीचे थीम सॉंग हे त्यांचे मल्याळम सिनेमातील शेवटचे गाणे होते. त्यांच्यावर अनेक वर्षे किडनी संबंधित आजारावर उपचार सुरू होते.
संबंधित बातम्या