अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत; चेंगराचेंगरी प्रकरणात वर्षभरानंतर मोठी कारवाई; पोलीस चार्जशीटमध्ये अभिनेत्याचं नाव
संध्या थिएटरच्या व्यवस्थापन आणि मालकांवर अभिनेत्याच्या येण्याची माहिती असूनही गर्दी नियंत्रणाचे उपाय न राबवण्याचा आरोप चार्जशीटमध्ये केला गेला आहे.

Allu Arjun: तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमधील त्याच्या निवासस्थानी अटक करण्यात आली होती. 4 डिसेंबर 2024 रोजी चिक्कडपल्ली येथील आरटीसी एक्स रोड्सवरील संध्या थिएटरमध्ये त्यांच्या हिट चित्रपट पुष्पा 2: द रूलच्या प्रीमियरदरम्यान घडलेल्या चांगराचेंगरी प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता,तर तिचा 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. मात्र, अभिनेता काही वेळातच सुटला होता. या घटनेला जवळपास एक वर्ष झाल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. अभिनेता अल्लू अर्जुनसह 23 जणांचा यात समावेश आहे.
अल्लू अर्जुनसह 23 आरोपी
हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये 23 आरोपींचा समावेश असून या यादीत अल्लू अर्जुनचं नाव देखील समाविष्ट केलं आहे. चिक्कडपल्ली पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीस सादर केलेल्या चार्जशीटमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनसह, त्याच्या खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा आणि थिएटर व्यवस्थापनाचा समावेश केला आहे. अल्लू अर्जुनाला आरोपी क्रमांक 11 (A-11) म्हणून सूचीबद्ध करण्यात आलं असून, संध्या थिएटर व्यवस्थापनाला मुख्य आरोपी ठरवण्यात आलं आहे.
संध्या थिएटरच्या व्यवस्थापन आणि मालकांवर अभिनेत्याच्या येण्याची माहिती असूनही गर्दी नियंत्रणाचे उपाय न राबवण्याचा आरोप चार्जशीटमध्ये केला गेला आहे. अल्लू अर्जुनवर अत्यधिक गर्दीच्या परिस्थितीत स्थळ फेरफटका मारल्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय न केल्याचा आरोप आहे.
कोणत्या कलमान्वये गुन्हा?
चार्जशीटमध्ये अल्लू अर्जुनाचे खाजगी मॅनेजर, कर्मचारी आणि आठ खाजगी बाउंसर यांचा समावेश आहे, ज्यांच्या कार्यामुळे परिस्थिती आणखी विस्कळीत झाली. पोलिस अहवालात अनेक गंभीर चूका नमूद करण्यात आल्या आहेत. थिएटर व्यवस्थापनावर व्हीआयपी पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध न करणे ह्या कारणासाठी निष्काळजीपणाचा आरोप आहे. तपासात असेही समोर आले की सुरक्षा कारणास्तव पोलिसांनी सुरुवातीला अभिनेता कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाकारली होती. थिएटर मालकांवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) अंतर्गत तसेच इतर संबंधित कलमांन्वये जखमी करणे व सार्वजनिक सुरक्षा धोक्यात टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.























