22nd Third Eye Asian Film Festival: 22वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची तारीख ठरली; 56 चित्रपटांची निवड, कुठे दाखवले जाणार सिनेमे?
22nd Third Eye Asian Film Festival: बूसान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या 'ऑन यूअर लॅप' या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनानं महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.

22nd Third Eye Asian Film Festival: महाराष्ट्रातील (Maharashtra News) चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा '22 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव' दिनांक 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण 56 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडलेले हे 56 चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. बूसान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या 'ऑन यूअर लॅप' या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनानं महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
'22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'चं आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. "गेली बावीस वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणं हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण आहे, असं आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम म्हणाले..."
जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजत असलेले चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना पाहता यावेत या उद्देशाने आशियाई फिल्म फाऊंडेशन संस्थेतर्फे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन सन 2002 पासून करण्यास सुरुवात झाली. गेली बावीस वर्ष हा चित्रपट महोत्सव मुंबई आणि ठाण्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे.
"यावर्षी 56 निवडक चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देणार आहोत. किर्गिस्तान देशातील चित्रपटांचा विशेष विभाग, मराठी आणि भारतीय चित्रपटांची स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन यामुळे हा महोत्सव चित्रपटप्रेमींसाठी एक उत्सव ठरणार आहे" अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. संतोष पाठारे यांनी दिली.
आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचं आकर्षण ठरणार आहे. मराठी चित्रपट स्पर्धा विभागात अकरा मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. एप्रिल मे 99, सांगळा, गमन, गिराण, गोंधळ, किमिडीन, निर्जळी, प्रिझम, साबर बोंड, सोहळा, उत्तर या सिनेमांचा या विभागात समावेश आहे. "थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मी दिग्दर्शित केलेला 'उत्तर' हा चित्रपट दाखवला जाणार आहे याचा मला आनंद वाटतो आहे. मराठी चित्रपटांना स्पर्धा विभागात सहभागी करून घेणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसोबत प्रदर्शित होणे ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाची संधी आहे. असे व्यासपीठ नवीन चित्रपटकारांना प्रोत्साहन देतात.", असं उत्तर चित्रपटाचे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन म्हणाले. भारतीय चित्रपट स्पर्धा विभागात आसामी, कन्नड, मणिपूरी, मल्याळी, बंगाली, नेपाळी या भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. तसंच आशियाई स्पेक्ट्रम या विभागात चीन, जपान, हाँग काँग, तुर्की, कझाकस्तान, विएतनाम, इराण, फिलिपिन्स, थायलंड या देशातील चित्रपटांचा समावेश आहे. यावर्षी कन्ट्री फोकस या विशेष विभागात किर्गिस्तान या देशाचा समावेश आहे. किर्गिस्तानमधील समकालीन आणि पारंपरिक कथांच्या निवडक चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे.
महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्म भुषण सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार' देण्यात येणार आहे. आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेले दो आँखे बारा हाथ, डॉ. कोटनीस की अमर कहानी, कुंकू, नवरंग हे चित्रपट दाखवण्यात करण्यात येणार आहे. चित्रपट प्रदर्शनासह मान्यवर ज्युरी सदस्यांबरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचं आयोजनही करण्यात येणार आहे.
महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी https://www.thirdeyeasianfilmfestival.com/ या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.
22 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एनएफडीसी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे























