9 रुपये उत्पन्न असलेला 'हा' उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांना देणार टक्कर
सोलापूर मतदार संघ यंदाच्या लोकसभेत चर्चेत राहिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेत सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर या मोठ्या नेत्यांमुळे सोलापूर मतदारसंघ आधीच चर्चेत होता. मात्र व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांच्यामुळे या चर्चेत आणखी भर पडली आहे.
सोलापूर : निवडणूक म्हटलं की उमेदरांकडून वारेमाप पैशाची उधळण होणे हे निश्चित मानलं जातं. तसेच उमेदवारी दाखल करताना प्रतिज्ञापत्रातील नेत्यांची संपत्ती पाहून मतदारांने डोळे पांढरे होतात. मात्र 9 रुपये उत्पन्न असलेला एक उमेदवार सोलापुरात चर्चेचा विषय बनला आहे. व्यंकटेश्वर महास्वामी असं या उमेदवारांचं नाव असून ते हिंदूस्थान जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत.
सोलापूर मतदार संघ यंदाच्या लोकसभेत चर्चेत राहिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर या मोठ्या नेत्यांमुळे सोलापूर मतदारसंघ आधीच चर्चेत होता. मात्र व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांच्यामुळे या चर्चेत आणखी भर पडली आहे.
व्यंकटेश्वर महास्वामी हे हिंदुस्थान जनता पार्टीचे उमेदवार आहेत. व्यंकटेश्वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी अवघं 9 रुपये उत्तन्न दाखवलं आहे. तर उमेदवारी अर्जासाठी डिपॉझिट रक्कम जमा करण्यासाठी 45 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितलं आहे. निवडणूक लढवणाऱ्या आरक्षित उमेदवाराला 12,500 रुपये डिपॉझिट जमा करावं लागतं, तर खुल्या गटातील उमेदवाराला 25 हजारांचं डिपॉझिट जमा करावं लागतं.
कोण आहेत व्यंकटेश्वर महास्वामी?
व्यंकटेश्वर महास्वामी यांचा कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत समावेश आहे. 31 वर्षीय व्यंकटेश्वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉमची पदवी मिळवली आहे. व्यंकटेश्वर यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही. तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
व्यकंटेश्वर महास्वामी हे महाराष्ट्रातून जरी पहिल्यांदा निवडणूक लढवत असले तरी यापूर्वी त्यांनी विविध निवडणुकांत उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोलापूर वगळता विजयापूर येथूनही ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यामुळे एकीकडे कोट्यधीश उमेदवार निवडणूक रिंगणात असताना केवळ 9 रुपये हाती आणि 45 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकाव धरुन राहतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.