Vidhan Parishad Election : भाई जगताप की प्रसाद लाड? विधानपरिषद निवडणुकीत दहाव्या जागेसाठी कडवी लढत
Vidhan Parishad Election 2022: विधानपरिषद निवडणुकीत दहाव्या जागेसाठी कडवी लढत होणार आहे. काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात ही लढत असणार आहे.
Vidhan Parishad Election 2022: विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत एक- एक मत महत्वाचं आहे. विधानपरिषद निवडणुकीत दहाव्या जागेसाठी कडवी लढत होणार आहे. काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात ही लढत असणार आहे. भाई जगताप दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शीअल वोटींग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्यासाठी 26 मतं मिळू शकतील. मात्र भाई जगताप यांना जिंकण्यासाठी आठ मतं कमी पडतायत. या आठ मतांसाठी काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे.
शिवसेनेकडील अतिरिक्त मतं काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे प्रसाद लाड यांच्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शक्ती पणाला लावली आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांची जागा काँग्रेसकरता प्रतिष्ठेची मानली जात आहे.
भाई जगताप यांची मदार प्रेफरन्शीअल वोटिंग आणि अपक्ष आमदारांवर आहे. भाई जगताप यांना आवश्यक ८ मतांसाठी काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. काँग्रेसने शिवसेनेकडे अतिरिक्त मतांचा जोगवा मागितला असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे प्रसाद लाड यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची शक्ती पणाला लागली आहे.
विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?
- विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मतांची आवश्यकता आहे.
- राज्यसभेप्रमाणे मतदान झालं तर भाजपकडे सध्या 123 संख्याबळ आहे.
- त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.
- पाचव्या उमेदवारासाठी भाजपला 12 मतं कमी पडतात
- महाविकास आघाडीकडे 161 संख्याबळ आहे.
- त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील.
- तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.