चंद्रशेखर आझाद यांचा लोकसभा निवडणुकीत बोलबाला, तब्बल दीड लाख मतांनी विजय!
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला चांगलाच फटका बसला आहे. येथे भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याच निवडणुकीत चंद्रशेखर आझाद विजयी झाले आहेत.
लखनौ : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अनेक जागांवर अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल आला आहे. यावेळी भाजप (BJP) तसेच भाजपप्रणित एनडीएचा (NDA) अनेक महत्त्वाच्या जागांवर पराभव झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Election 2024 Result) नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या राज्यात भाजपला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात नगिना ही जागा यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिली. या जागेवर चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी तब्बल दीड लाख मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.
आझाद यांनी भाजपच्या उमेदवाराला केलं पराभूत
चंद्रशेखर यांच्या या विजयामुळे आगामी काळात उत्तर प्रदेशमधील राजकारण बदलणार का? असा प्रश्न विचारले जात आहे. चंद्रशेखर आझाद हे दलित समाजाचे नेते आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी दलितांच्या अनेक समस्यांवर बोट ठेवत सरकारला धारेवर धरलेलं आहे. यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत उडी घेत नगिना ही जागा लढवली. या निवडणुकीत त्यांचा तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने विजय झाला आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ओम कुमार यांना पराभूत केले.
नगिना जागेवर कोणाला किती मते मिळाली?
या निवडणुकीत चंद्रशेखर आझाद (आझाद समाज पार्टी-कांशीराम) यांना एकूण 5 लाख 12 हजार 552 मते मिळाली. दुसरीकडे ओम कुमार यांना 3 लाख 61 हजार 79 मते मिळाली. समाजवादी पार्टीचे मनोज कुमार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 1 लाख 2 हजार 374 मते मिळाली. विशेष म्हणजे मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या उमेदवाराला येथे फक्त 13 हजार 272 मते पडली.
उत्तर प्रदेशमध्ये दलितांना मिळाले नवे नेतृत्त्व?
चंद्रशेखर आझाद यांच्या या विजयामुळे उत्तर प्रदेशमध्ये दलित समाजाला नवे नेतृत्त्व मिळाले आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत. 2019 साली या जागेवर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा विजय झाला होता. दलित आणि बहुजनांचे नेतृत्त्व करणारा हा पक्ष कधिकाळी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत होता. पण आता याच जागेवर चंद्रशेखर आझाद यांचा विजय झाला आहे.
कन्हैया कुमार यांचा पराभव
काँग्रेस पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांचा या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी उत्तर पूर्व दिल्ली येथून भाजपचे नेते मनोज तिवारी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. येथे मनोज तिवारी विजयी झाले आहेत.
हेही वाचा :