(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akhilesh Yadav : मोदी-योगींसमोर अखिलेश यादवांची सायकल सुस्साट; उत्तर प्रदेशात 'ही' स्ट्रॅटेजी आली मदतीला!
Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाने 37 जागा जिंकल्या असून आता देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आखलेली रणनीति चांगलीच यशस्वी झाली.
मागील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने बहुजन समाज पक्षासोबत आघाडी केली होती. मात्र, त्यांना अवघ्या पाचच जागांवर विजय मिळाला. यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने आघाडीत 62 जागांवर निवडणूक लढवली. काँग्रेसने 17 जागांवर आणि एक जागेवर तृणमूल काँग्रेसने निवडणूक लढवली.
तिकीट वाटपात जातीय समीकरणांकडे लक्ष...
2019 च्या निवडणुकीत माजी कॅबिनेट मंत्री शिवपाल सिंह यांनीच सपापासून फारकत घेतली होती, मात्र यावेळी कुटुंब एकत्रित आले आणि यामुळे मतदारांमध्ये योग्य संदेश गेला. समाजवादी पक्षाने उमेदवार देताना आपल्या 'पीडीए'(PDA) सूत्राची काळजी घेतली. यादव आणि मुस्लिमांपेक्षा कुर्मी समाजाचे उमेदवार उभे करण्यात आले. यादव आणि मुस्लिम मतदार हे सपाच्या मतांचा आधार समजला जातो.
भाजपच्या जाळ्यात अडकले नाहीत...
ब्राह्मण आणि ठाकूरांसह इतर जातीतील उमेदवारांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले. अखिलेश यांची ही खेळी अगदी योग्य होती आणि पक्षाला अनपेक्षित यश मिळाले. अखिलेश यादव यांनी स्वत:ला आणि पक्षाला स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वादग्रस्त विधानांपासून दूर ठेवले. अत्यंत विनम्रपणे त्यांनी राम मंदिराच्या लोकार्पणावर कोणतेही भाष्य करणे टाळले.
इतकंच नाही तर त्यांनी इटावामध्ये एका भव्य मंदिराचे काम सुरू केले. त्यामुळे धार्मिक मुद्यावर घेरणे भाजपला कठीण गेले. संविधान आणि आरक्षणाच्या मुद्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्याशिवाय पेपर लीक आणि अग्निवीरच्या मुद्याला प्राधान्य देत बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. त्याचा फायदा अखिलेश यादवांना झाला.
प्रचारात लोकांच्या मुद्यावर भाष्य...
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने केलेल्या प्रचाराची दिशा योग्य दिशेने ठेवली. संविधान आणि आरक्षणाच्या मु्द्यामुळे बसपा आणि भाजपला मानणारा वंचित घटकातील मतदार समाजवादी पक्ष-इंडिया आघाडीकडे वळला. मुस्लिम मतदारही इंडिया आघाडीकडे वळला. त्याशिवाय स्थानिक पातळीवर खासदारांबाबत असलेली नाराजीदेखील भाजपला भोवली.