अजय बिष्ट... गोरखपूरचे मठाधिपती ते यूपीचे मुख्यमंत्री! कसा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास
Yogi Aditynath : अजय बिष्ट नावाचा सामान्य व्यक्तीचा योगी आदित्यनाथ आणि नंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास रंजक आहे.
लखनौ: अजय मोहन बिष्ट... हे नाव लगेच लक्षात नाही येणार. पण योगी आदित्यनाथ म्हटलं की लगेच लक्षात येतं. भाजपाच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रमुख चेहरा, गोरखपूर मठाचे मठाधीपती आणि उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे योगी आदित्यनाथ. पण या योगींचे मूळ नाव हे अजय बिष्ट असं आहे. या अजय बिष्ट नावाच्या व्यक्तीचा योगी आदित्यनाथ ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पर्यंतचा प्रवास हा बराच रंजक आहे.
सध्याच्या उत्तराखंडमधील पंचुर या गावी 5 जून 1972 रोजी एका गढवाली ठाकूर परिवारात अजय बिष्ट यांचा जन्म झाला. त्यांनी उत्तराखंडमधूनच आपलं शिक्षण पूर्ण केलं. श्रीनगर जिल्ह्यातील गढवाल विद्यापीठातून त्यांनी गणितात बीएस्सी केली. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान अजय बिष्ट हे रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडले गेले आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली.
दीक्षा घेतली आणि नाव बदललं
नेमक्या याच काळात त्यांची ओळख गोरखपूरमधील गोरक्षपीठाचे महंत अवैद्यनाथ यांच्याशी झाली अन अजय बिष्ट यांच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं. सन 1993 साली वयाच्या 21 व्या वर्षी अजय बिष्ट यांनी घराचा त्याग केला आणि गोरखपूर गाठलं होतं. दिक्षा घेण्याचा निर्णय घेतलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी मनवण्याचा खूप प्रयत्न केला. पण हाती निराशाच आली. महंत अवैद्यनाथ हे यूपीच्या राजकारणातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक मानले जात होते आणि त्यांचा पूर्वांचलच्या राजकारणावर विशेष प्रभाव होता. महंत अवैद्यनाथ यांनी अजय बिष्ट यांची राजकीय क्षमता ओळखून त्यांना आपले शिष्य बनवले आणि त्यांचे नाव बदलून योगी आदित्यनाथ अशी नवी ओळख दिली. 15 फेब्रुवारी 1994 रोजी अजय बिष्ट यांनी दीक्षेची प्रक्रिया पूर्ण केली. नाथपंतांच्या दीक्षा प्रक्रियेनंतर त्यांना योगी आदित्यनाथ अशी नवी ओळख मिळाली.
संन्यासचा पहिला धर्म असतो सेवा...
योगी आदित्यनाथ यांनी गोसेवा करायचं ठरवलं. पण त्यांच्या गुरुजींनी त्यांना इतर काही जबाबदाऱ्याही दिल्या. मठातल्या जेवणाच्या पंगतींची व्यवस्था करायला सांगितली. जिथे विना भेदभाव प्रत्येक व्यक्तीला नीट जेवण करता आलं पाहिजे. या ठिकाणी 1200- 300 लोक दिवसाला जेवण करायचे.
पण एकदा योगिनीं गुरूजींना विचारलं, इथे तर काम आधीपासून सुरळीत चालायचं, मग माझी नेमणूक वेगळी करायचं कारण काय? तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले, तुला पुढे जिथे जायचं आहे. त्यासाठीची ही तयारी आहे.
योगींनी एका मुलाखतीत सांगितलंय, 1998 ला त्यांना निवडणूक लढायला सांगण्यात आलं. त्यावेळी ते पहिल्यांदा निवडून आले आणि खासदार झाले. पण एका वर्षात योगी कंटाळून गेले. 1999 साली जेव्हा एका मतामुळे अटलजींचं सरकार पडलं, तेव्हा त्यांनी गुरुजींना सांगितलं की, मला निवडणूक नाही लढायची. कारण वास्तविक मुद्द्यावर राजकारणात चर्चा कधीच नाही होत. खोटं तर सर्रास बोललं जातं.
तेव्हा गुरुजींनी त्यांना सांगितलं, तू इथे खूप चांगलं काम करतोय, ज्या निर्मलतेने तुझं इथे काम सुरू आहे, तसंच तुला राजकारणात काम करता यायला हवं, तेही बिना झुके बिना रुके... त्यामुळे मोदी-शाहांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी योगीचं नाव पुढे केलं, तेव्हा योगी मागे हटले नाहीत. मोदी आणि अमित शहांच मार्गदर्शन घेऊन पुढे निघाले.
पाच वेळा लोकसभेवर खासदार
योगी आदित्यनाथ 1998 सालापासून, वयाच्या 26 व्या वर्षांपासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. 1998 साली योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसमितीचे सदस्य म्हणून काम केले. 1999 मध्ये योगी दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांची अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण विषयक स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2004 साली त्याच मतदारसंघातून 14 व्या लोकसभेसाठी योगी तिसऱ्यांदा निवडून आले. ते गृहमंत्रालयाच्या सल्लागार समितीत होते.
सन 2009 मध्ये योगी चौथ्यांदा निवडून आले. परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीवरील स्थायी समितीचे आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे ते सदस्य झाले. 2014 मध्ये 16 व्या लोकसभेसाठी योगी पाचव्यांदा निवडून आले.
खासदारकीचा राजीनामा आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ
सन 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 403 पैकी 312 जागा मिळवून सत्तेत आला. त्यावेळी खासदार असलेल्या योगी आदित्यानाथांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजपाने पुढे आणलेल्या योगींना मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवलं.
योगी आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख मठाधिपती आहेत. ते हिंदी साप्ताहिक आणि मासिक पत्रिका योगवानीचे मुख्य संपादक आहेत. शिवाय हिंदू युवा वाहिनी या युवा संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांच्यावर अनेकदा प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप झाला आहे. 2005 मध्ये ख्रिश्चनांना 'शुद्धिकरण' करून हिंदू धर्मात प्रवेश देण्याच्या त्यांच्या कृतीमुळे योगी आदित्यनाथ देशभर चर्चेत आले. 'जे योगाला विरोध करतात, त्यांनी देशातून चालते व्हावे,' असे विधान त्यांनी 2015 मध्ये केले.
योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान याची तुलना पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदशी केली होती आणि शाहरूखला पाकिस्तानात जायचा सल्लाही दिला होता. योगींनी मुख्यमंत्री झाल्यापासून कधी शहरांची नावे बदलली तर कधी इमारतींचा रंग भगवा केला.
योगी हे देशातील हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे मोदी-शहांना देखील त्यांची दखल घ्यावीच लागतेय.18 डिसेंबरला शहाजहानपूरच्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगींचे कौतुक करताना म्हटलं होतं की Up + Yogi म्हणजे उपयोगी. पण आता हे योगी यूपीसाठी किती उपयोगी ठरतात ते निवडणुकीचा निकालच ठरवेल.
संबंधित बातम्या :
- Uttar Pradesh : गोरखपूरमध्ये योगींच्या विरोधात त्यांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्याची पत्नी; भीम आर्मीचे चंद्रशेखर आझादही मैदानात
- UP Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपकडून आतापर्यंत 194 उमेदवारांची यादी जाहीर; कोणाकोणाला उमेदवारी?
- UP Election : प्रियांका गांधी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जाणून घ्या काय म्हणाल्या प्रियांका गांधी