Uddhav Thackeray: खाष्ट सासू, खरा गद्दार, राज ठाकरेंचा हल्लाबोल; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Uddhav Thackeray On Raj Thackeray: महाविकास आघाडीचे वांद्रे पूर्वमधील उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे बोलत होते.
Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई: सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे खाष्ट सासू असल्याचा हल्लाबोल देखील राज ठाकरेंनी शिवडीमधील जाहीर सभेत केला. राज ठाकरेंच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीचे वांद्रे पूर्वमधील उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे बोलत होते.
एक पक्ष आहे कोणता तरी...पहिले झेंडा वेगळा होता आणि आता झेंडा बदलला आहे. त्यानंतर इंजिन इकडे तिकडे झाले. पहिले मनसे होतं आता गुनसे आहे. गुजरात नवनिर्माण सेना...जो महाराष्ट्राचा घात करेल, त्याला गुनसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलेलं आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच काही ध्येय नाही, धोरण नाही..दिशा नाही...काहीही वाटेल ते बोलायचं. आजही काहीतरी बोललेत, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला.
नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल-
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, खरंच बहिणी लाडक्या असतील तर किमान माझ्या महिलांना रेल्वे प्रवास मोफत करुन दाखवा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे प्रचाराला जेव्हा फिरत होते, तेव्हा मणिपूरमध्ये अत्याचार सुरु होते, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. गेल्यावेळी मतांमध्ये विभागणी झाली. ते यावेळी करु नका...तुमच्या आणि तुमच्या भावी पीढीला अंधारात घ्यायचं असेल तर महाझुठीला मत द्या...भविष्य प्रकाशित करायचं असेल तर मशालीला मतदान करा, असं उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना सांगितलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलताय. खरा गद्दार तर घरात बसलाय, तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले. या माणसाच्या वागणुकीमुळे पहिले राणे बाहेर पडले, त्यानंतर मी बाहेर पडलो, आता शिंदे..असा घणाघात राज ठाकरेंनी केला. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला, त्यांना उद्धव ठाकरेंनी घरी जेवायला बोलावलं, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
ठाकरे बंधूंमध्ये वार-पलटवार, Video: