Suresh Dhas : निवडून येताच भाजपच्या सुरेश धसांची पंकजा मुंडेंवर टीका, मी तुम्हाला बहीण म्हणत होतो आणि... असं करायला नको होतं
Ashti Assembly Result : तुमचे पीए येतात आणि अपक्ष उमेदवाराला मत द्यायला सांगतात, हे काही बरोबर नाही असं म्हणत भाजपचे नवनियुक्त आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली.
![Suresh Dhas : निवडून येताच भाजपच्या सुरेश धसांची पंकजा मुंडेंवर टीका, मी तुम्हाला बहीण म्हणत होतो आणि... असं करायला नको होतं Suresh Dhas slams pankaja munde bjp Ashti Assembly Result Maharashtra Assembly Election 2024 marathi Suresh Dhas : निवडून येताच भाजपच्या सुरेश धसांची पंकजा मुंडेंवर टीका, मी तुम्हाला बहीण म्हणत होतो आणि... असं करायला नको होतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/dbce83a43b2c2b6f99aa2cce1857baac173237797813193_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : पंकजाताई, मी तुम्हाला बहीण मानत होतो. पण तुम्ही माझ्याविरोधात काम केलं. तुम्ही असं करायला नको होतं असं म्हणत आष्टीचे नवनियुक्त आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर यांच्याविरोधात आपला रोष व्यक्त केला. तुमच्या आजूबाजूचे लोक बदला असा सल्लाही त्यांनी दिला.
आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी 75 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. हा विजय झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आष्टी मतदारसंघात मोठा जल्लोष केला. यादरम्यान आयोजित विजयी सभेत सुरेश धस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस म्हणाले की, "पंकजाताई,तुम्ही असं करायला नको हवं होतं. तुम्ही शिरूर येथील सभेत येतात आणि भाजपाचा पंचा खाली टाकता. तुमचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगतात. पंकजाताई तुम्ही एक चांगला व्यक्ती गमावला आहे. तुमच्या जवळचे लोक बदला."
आष्टीमध्ये चौरंगी लढत, सुरेश धसांची बाजी
आष्टी विधान सभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत झाली. राज्यांमध्ये ज्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या त्यात महायुती मधील मैत्रीपूर्ण लढतही आष्टी विधानसभा मतदार संघात होती. आष्टी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून सुरेश धस हे मैदानात होते. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे हे निवडणूक लढवत होते.
गतवेळेस बाळासाहेब आजबे यांनी येथील मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, महायुतीकडून त्यांना जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. तर भाजपमधूनच बाहेर पडलेले भीमराव धोंडे अपक्ष निवडणूक लढवत होते. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेहबूब शेख हे उमेदवार म्हणून प्रथमच विधानसभा लढवत होते. या चौरंगी लढतीमध्ये भाजपच्या सुरेश धसांनी बाजी मारली.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)