बार्शीचे आ. दिलीप सोपल यांचा राष्ट्रवादीला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार
भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटपनुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर : विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरुच आहे. राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला अखेर रामराम ठोकला आहे. लवकरच दिलीप सोपल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही कार्यकर्त्यांसमोर शिवसेनेत जाणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली.
बार्शीची राजकीय परिस्थिती पाहता निर्णय घेतला असल्याची माहिती दिलीप सोपल यांनी दिली. येत्या 28 ऑगस्टला दुपारी 1 वाजता मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीला आमदार दिलीप सोपल यांनी दांडी मारली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु झाली होती. आज त्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे.
भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटपनुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बोललं जातं. आमदार दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल यांचा मार्ग मोकळा झाला आहे.