एक्स्प्लोर
सेना-भाजप भांडण नवरा-बायकोसारखं, बायको स्वतःच नांदायला आली : श्रीनिवास वनगा
'काही कारणास्तव रागवून बाहेर राहिलो, मात्र आता बायकोच आपणहून नवऱ्याकडे आली आहे. म्हणून मीच सांगितलं, बाबा आता तूच संसार कर.' असं श्रीनिवास वनगा म्हणाले.
पालघर : शिवसेना-भाजपमधील भांडण हे नवरा-बायकोसारखं आहे. नवरी आता स्वतःच माझ्याकडे नांदायला आली आहे, अशा कोपरखळ्या पालघरच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी मारल्या. वनगा यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
'काही कारणास्तव रागवून बाहेर राहिलो, मात्र आता बायकोच आपणहून नवऱ्याकडे आली आहे. म्हणून मीच सांगितलं, बाबा आता तूच संसार कर.' असं श्रीनिवास वनगा म्हणाले. पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात श्रीनिवास वनगा बोलत होते.
'उद्धव साहेब प्रत्येक भाषणात सांगायचे. त्यांनी मला विनंतीही केली, ही जागा श्रीनिवास तुझ्यासाठी मागून घेतली. परंतु मी विचार केला, या राजकारणात मी नवखा आहे. बरंच काही शिकायचं आहे. मी स्वतःहून पक्षप्रमुखांकडे माझं म्हणणं मांडलं. साहेब एवढी मोठी झेप मला घ्यायची नाही. प्रथम मला या भागात काम करु दे.' असं स्पष्टीकरण श्रीनिवास वनगा यांनी दिलं.
पालघरमध्ये 2014 साली निवडून आलेले खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना तिकीट दिलं, तर त्यांच्याविरोधात भाजपने राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली. पोटनिवडणुकीत गावित खासदारपदी निवडून आले. त्यानंतर शिवसेनेने 2019 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. मात्र ऐनवेळी भाजप खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. विधानसभेच्या आमदारकीबाबत शिवसेनेने वनगा यांना मधाचं बोट लावलं आहे.
VIDEO | शिवसेनेकडून राजेंद्र गावितांना पालघरची उमेदवारी, वनगांना आमदारकीचं आश्वासन
'जसं बाबांनी आमदार-खासदार असताना मोठी संपत्ती जमवून ठेवली नाही, तर तुमच्यासारख्या माणसांचं प्रेम-आपुलकी कमावली. बाबांमुळेच मला कानाकोपऱ्यात मान सन्मान मिळतो, हीच माझ्यासाठी मोठी संधी आहे.' अशा भावना श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केल्या.
'आधी मी पालघर जिल्ह्यामध्ये उद्धवजी सांगतील, ते काम करणार आहे. स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे. मी मागे हटलेलो नाही. मी आमदारही होणार आहे आणि खासदारही होणार आहे. पण घाई नाही' असा निर्धारही यावेळी वनगा यांनी बोलून दाखवला.
'आपल्याकडे भूकंपाचे धक्के जाणवत होते. तेही आता सौम्य वाटायला लागतील. मोठा भूकंप आपण 23 तारखेला घडवणार आहोत. दिल्लीत महायुतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बसवायचे आहेत.' असं आवाहन वनगांनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement