विकासकामांमध्ये शिवसेनेचाही सिंहाचा वाटा, भाजपच्या होर्डिंग्सवरुन उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणूनच हे सरकार स्तिर होतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यातील लोह येथील सभेत बोलत होते.
नांदेड : महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं आज स्पष्ट झालं आहे. राज्याच्या विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांच्या होर्डिंग्स लागल्या आहेत. याच होर्डिंग्सवरून उद्धव ठाकरे यांनी मोदी-फडणवीसांवर निशाणा साधला. होर्डिंग्समध्ये दाखवलेली कामे या सरकारने जरूर केली आहेत, पण या विकासकामांमध्ये शिवसेनेचा देखील सिंहाचा वाटा आहे, हे विरोधकांसह सर्वाना मान्य करावे लागेल. असं म्हणत विकासाचे श्रेय शिवसेनेचंही असल्याचं उद्धव ठाकरेंनी सुचवलं.
शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणूनच हे सरकार स्तिर होतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यातील लोह येथील सभेत बोलत होते. शुगर आणि हार्टअटॅक सारखे आजार सर्वांना होतात. हार्टअटॅक तपासणी आणि उपचारासाठी खूप खर्च येतो. मी त्याचा अनुभव घेतला आहे. मला वेळेवर उपचार मिळाले नसते तर मी आज तुमच्यासमोर उभा नसतो. म्हणूनच मी गरिबांच्या आरोग्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिलं असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
औरंगाबाद की संभाजीनगर या विषयावर आज उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच असा खुलासा केला. लोकसभेला थोडी गडबड झाली आणि आपल्या हक्काच्या संभाजीनगरमधील भगवा झेंडा खाली उतरला. तिथे दुर्दैवाने हिरवा झेंडा फडकत आहे. हा हिरवा झेंडा रझाकारांचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही आमच्या वचननाम्यात 10 रुपयात सकस आहार देण्याचे वाचन दिले आहे. पण शरद पवारांनी यात भ्रष्टाचार होईल, असा संशय व्यक्त केला. खरंतर शरद पवारांनी अन्य कुणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करावेत, हाच खूप मोठा विनोद असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.