मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची शिष्टाई फळाला आली असून महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भावरुन सुरू असलेला वाद अखेर निवळला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीतील तणाव निवळला असून काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यामध्ये, मुंबईतील बहुतांश जागांवर शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस-103 ते 108 जागांवर निवडणूक लढेल. तर, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला 90 ते 95 जागा देण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीत (MVA) तिसऱ्या नंबरचं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला 80 ते 85 जागा देण्यात येणार असून मीत्र पक्षांसाठीही जागा सोडण्यात येत आहेत. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसाठी 3 ते 6 जागा सोडण्यात आल्याचे समजते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागावाटपाचा हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची शिष्टाई फळाला आली असून महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भावरुन सुरू असलेला वाद अखेर निवळला आहे. बाळासाहेब थोरांत यांच्या मध्यस्तीनंतर ठाकरे आणि काँग्रेसनं सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीतील मुंबईच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून मुंबईत ठाकरेंची शिवेसनाच मोठा भाऊ आहे. मुंबईत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरे गट लढवणार असून शिवसेना ठाकरे युबीटी पक्षाला 18 जागा देण्यात येत आहेत. तर, काँग्रेस 14 जागांवर निवडणूक लढेल. ( त्यापैकी 11 जागांवर शिक्कामोर्तब तर 2 जागांवर चर्चा सुरू आहे). शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मुंबईत केवळ 2 जागा मिळणार आहेत. (अणुशक्ती नगर आणि घाटकोपर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता). तर, समाजवादी पार्टी- 1 (शिवाजी नगर) आणि आम आदमी पक्ष 1 जागा सुटणार असल्याचा मुंबईतील फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. दरम्यान, मुंबईतील वर्सोवा, भायखळा आणि वांद्रे पुर्व या तीन जागांवर ठाकरे गट आणि कांग्रेसमध्ये आज तोडगा निघणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप करताना मविआच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या सर्व जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती आहे. आज दुपारी मविआच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक पार पडली. त्यानंतर, ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकरच महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल.
हेही वाचा
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे BMC चे आवाहन