मुंबईत घडामोडींना वेग! इकडं शिंदेची उमेदवारांसोबत बैठक, तिकडे शरद पवारांचा कानमंत्र, मतमोजणीआधी पक्षांकडून मास्टर प्लॅनिंग!
Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी राज्यभर मतमोजणीची प्रक्रिया चालू होणार आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Result) 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आता सर्वांनाच 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा लागली आहे. राज्यात कोणाचे सरकार येणार? हे 23 तारखेलाच समजणार आहे. त्यामुळेच राजकीय गोटातही मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. महायुती आणि माहविकास आघाडी यांच्याकडून आता अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्क साधला जातोय. दरम्यान, एकीकडे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागलेली असताना दुसरीकडे राजकीय पक्षाचे बैठकांचे सत्रही चालू झाले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे हे आपापल्या पक्षातील नेतेमंडळी यांच्याशी संवाद साधत आहेत.
शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचीही बैठक
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीने पक्षाची भूमिका मांडावी? यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
एकनाथ शिंदे उमेदवारांशी संवाद साधणार
या बैठकीनंतर मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. मतमोजणीवेळी काय काळजी घ्यायला हवी? याबाबत शिंदे उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या पक्षाची ऑनलाईन बैठक
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं आहे. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं? हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात? मतमोजणी संपताना सी-17 फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. या बैठकीत महाविकास आघाडी 157 जागांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :