(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्रचा पुढील मुख्यमंत्री कोण?; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नाव आलं समोर, नरेंद्र मोदी घेणार मोठा निर्णय
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीने 236 जागा जिंकल्या.
विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार अशी माहिती देखील समोर आली आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जर मुख्यमंत्रिपद शक्य झाले नाही, तर देवेंद फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असू शकतात, असाही अंदाज बांधला जात आहे.
एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ- एकनाथ शिंदे
राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांकडून भाजपला पुन्हा एकसंघ बांधण्याचा प्रयत्न-
देवेंद्र फडणवीस 2014 ला राज्याचे मुख्यमंत्री होते, पण, 2019 ला उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यानंतर, फडणवीसांनी पक्षाला पुन्हा उभारी देत स्वत:तला आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रापुढे नेलं. पुन्हा राजकीय समीकरणे जुळवून आणत आणि दोन पक्षात फूट पाडून राज्यात महायुतीचे सरकार आणले. मात्र, पक्षाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले होते. त्यानुसार, त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत भाजपला पुन्हा एकसंघ बांधण्याचा प्रयत्न केला.