(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Sharad Pawar vs Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांना पहिला झटका बसणार आहे. बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाली. तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांची मोठी इनकमिंग दिसून आली. मात्र आता विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) हे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. राहुल जगताप हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरही राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Vidha Sabha Election 2024) निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र, ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सुटली. ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी केली होती. माझी उमेदवारी मुंबईवरून नाही तर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने ठरवली आहे. यामुळे मी जनतेचे ऐकणार व अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे. निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला जनतेतून संधी मिळेल असा मला विश्वास व्यक्त करत राहुल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
राहुल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीचा अनुराधा नागवडे आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी बाजी मारली. आता विधानसभेच्या निकालानंतर बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. राहुल जगताप हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या