(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Crisis: घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार, पण शरद पवारांचे फोटो अन् व्हिडिओ वापरु नका; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
Sharad Pawar Vs Ajit Pawar: अजित पवार आणि शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत महत्त्वाचे निर्देश
नवी दिल्ली: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार गटाने अजितदादा गटाचे (Ajit Pawar NCP) घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने (SC) अजित पवार गटाला एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. या परिपत्रकात तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे (Sharad Pawar) फोटो आणि व्हिडीओ वापरु नका, अशा सूचना द्याव्यात, असे न्यायालयाने सुनवाले आहे. तुम्ही दोघांनी आपापल्या युद्धभूमीवर लक्ष केंद्रित करा. व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो. दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असे नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले.
अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. गेल्या सुनावणीत घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात अजित पवारांनी वर्तमानपत्रात द्यावी , असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आजच्या सुनावणीवेळी अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. आम्ही बारामतीत फिरवत असलेल्या गाड्यांवर न्यायप्रविष्ठ असल्याविषयीची जाहिरात दिली आहे , असेही अजित पवार गटाच्या वकिलांकडून सांगण्यात आले. यावेळी न्यायालयात अजित पवार आणि शरद पवार गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. घड्याळ चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर अजित पवार गटाचे वकील म्हणाले की, कोणताही संभ्रम उरलेला नाही. हे कशाच्या आधारावर इथे अर्ज घेऊन आले? आम्ही न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याचा मजकूर सर्वत्र प्रसिद्ध केला आहे, आज आम्ही पुरावे सादर केले आहे, असे अजित पवारांच्या वकिलांकडून सांगण्यात आले. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार हल्ला चढवला. हे स्वतः विरोधाभासी भूमिका मांडत आहेत. यांना शरद पवारांचे गुडविल वापरायचं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे काल, त्यात शरद पवारांचा उल्लेख आहे. ग्रामीण भागातील मतदार ट्विटर वगैरे खरंच पाहतात का? ग्रामीण भागात दिल्लीतील घडामोडींचाही परिणाम होतो, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाचा दोन्ही गटांना सल्ला
सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाच्या वकिलांच्या मागणीवर टिप्पणी करताना म्हटले की, मतदारांवर आमचा परिणाम होईल इतकं मतदारांना कमी समजू नका. शरद पवार स्वतः अजित पवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत ना? महाराष्ट्रातील लोकांना दोघांमधील भांडण माहिती नसेल , अस तुम्हाला वाटतं का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सिंघवी यांना विचारला. तुम्ही जर प्रत्यक्ष एकमेकांच्या विरोधात कितीतरी जागा लढताहेत तर मग लोकांना हे स्पष्ट माहिती आहे. आधीच आदेश पारीत करण्यात आला आहे, असेही न्यायालयाने म्हटले. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांची छबी न वापरता स्वतंत्रपणे लढण्याचे निर्देश दिले. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध 36 जागा लढत आहेत, अशी माहिती यावेळी कोर्टात देण्यात आली. अजित पवारांच्या वकिलांनी कोर्टात दाखवलेले फोटो सुनावणीसाठी तयार करण्यात आले आहेत, असे सिंघवी यांनी म्हटले. घड्याळ चिन्ह गोठवले पाहिजे, त्याऐवजी त्यांना कोणत हवं ते चिन्ह द्या, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अजित पवार गटाला काही सूचना केल्या. जरी व्हिडीओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा चेहरा का वापरता? तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडीओ कशाला वापरले पाहिजे? जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत तर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिल पाहिजे ना, असे न्यायमूर्तींनी म्हटले.
आणखी वाचा
बारामतीत अजित पवारांच्या बॅगा तपासल्या, चकल्या सापडल्या; अजितदादा म्हणाले, खा खा बाबा...,Video