Sharad Pawar : 'असं पाडा की महाराष्ट्रभर संदेश गेला पाहिजे, सगळ्यांचा नाद करायचा; शरद पवारांचा नाही'
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार टेंभूर्णी येथील सभेत पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
Sharad Pawar, सोलापूर : "एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुधं पाडायचं नाही. जोरात पाडायचं पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाही", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते टेंभूर्णी येथील प्रचार सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे सरकार महिलांविरोधी आहे, तरुणांविरोधी आहे, शेतकऱ्यांविरोधी आहे. तुम्हा आम्हा सर्वांच्या हिताची जपणूक करण्याची दृष्टी या सरकारची नाही. हे सगळं बदलायचं असेल तर सरकार बदललं पाहिजे.महागाईमुळे महिलांना घरचे प्रपंच चालवणे कठीण झाले आहे. दैनंदिन जीवनातील सामानावर सरकारने प्रचंड कर लावले आहे. या सगळ्या गोष्टींचा सामान्य माणसांना त्रास होतोय. यातून सामान्य माणसाची सुटका करायची असेल तर एकच काम तुम्ही करा आणि ते काम उद्याच्या 20 तारखेला करायचा आहे. ते काम करायचं असेल तर उद्याच्या 20 तारखेला सगळ्यांना एकच निकाल घ्यावा लागेल.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री प्रत्यक्षात राबवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. अलीकडच्या काळामध्ये या तालुक्या बद्दल बाहेर अधिक चर्चा आहे. एकेकाळी हा तालुका दुष्काळी तालुका होता. मी स्वतः या ठिकाणी आमदार होतो तेव्हा अनेकदा आलो होतो. त्यावेळेला मोरे नावाचे गृहस्थ आमदार होते. लाल टोपी घालायची आणि त्यानंतर रावसाहेब आमदार झाले. त्या सगळ्या काळामध्ये इथे आलो तर पहिली चर्चा व्हायची, दुष्काळासाठी काम द्या. त्याऐवजी काही मागणीच नसायची. लोकांनी त्या संकटाच्या काळामध्ये कष्ट केले, घाम गाळला आणि आपला प्रपंच चालवला. आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आम्ही सगळे प्रमुख लोक बसलो आणि पाण्याची दुखणं सोडवल्याशिवाय हा तालुका सुधारणार नाही ही गोष्ट आम्ही लोकांनी स्वीकारली.
मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितला तर आज इथे सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय आपल्या सगळ्यांसमोर नाही. सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी करणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणे हे ऐतिहासिक काम उद्याच्या 20 तारखेला तुम्हा सर्वांना करायचे आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी करा. माझी खात्री आहे की, महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या