उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये मतदानावेळी गोंधळ, बीएसएफ जवानांकडून गोळीबार
कैरानातील रसूलपूर गुजरान येथील मतदान केंद्रावर विना ओळखपत्र मतदान करण्यासाठी काही जण आले होते. मात्र त्यांना निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान करु न दिल्याने गोंधळ झाला. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांना हवेत गोळीबार करावा लागला.
लखनौ : पश्चिम उत्तर प्रदेशच्या कैराना लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी बीएसएफ जवानांना गोळीबार करावा लागल्याची घटना समोर आली आहे. कैरानातील कांधला येथील रसूलपूर गुजरान गावात हा प्रकार घडला आहे. विना ओळखपत्र मतदान करण्यास आलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी विरोध केल्याने हा सगळा गोंधळ झाला.
रसूलपूर गुजरान येथे दोघे जण मतदान करण्यासाठी आले होते. मात्र त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांना मतदान करण्यास विरोध केला. याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र मतदान केंद्रावर पोहोचले आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएसएफ जवानांनी हवेत गोळीबार केला. बीएसएफ जवानांच्या गोळीबारानंतर गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त घटनास्थळी पोहोचले आणि गावकऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा मतदान करण्यास सुरुवात केली.
मतदान प्रक्रियेदरम्यान गडबड करणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी बीएसएफ जवानांनी हवेत गोळीबार केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं.