Sahar Shaikh VIDEO : एमआयएमच्या 'पतंगा'मुळे मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला; सहर शेखचे जितेंद्र आव्हाडांना थेट आव्हान
Sahar Shaikh Mumbra Election : जितेंद्र आव्हाडांना अहंकार होता, आम्ही हरणार असं त्यांना वाटायचं. म्हणूनच 'कैसे हराया' हे शब्द हृदयापासून आले असं सहर शेख म्हणाली.

ठाणे : जितेंद्र आव्हाडांनी उमेदवारी देतो असा शब्द दिला होता, पण त्यांनी तो फिरवला. निष्ठावंतांना फसवणाऱ्या अशा नेत्यांना मी जर आव्हान दिलं नसतं तर अल्लाहला काय उत्तर दिलं असतं? आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचे चार नगरसेवक पाडले असं वक्तव्य मुंब्राची नवनियुक्त नगरसेविका सहर शेखने (Sahar Shaikh) केलं. एमआयएमच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे म्हणून संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं म्हटलं होतं, तो वेगळा रंग असता तर तसं म्हटलं असतं असंही ती म्हणाली. भविष्यात शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नावर काम करणार असल्याचं सहर शेखने स्पष्ट केलं.
शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रामध्ये एमआयएमने मुसंडी मारली. त्यामध्ये सहर शेख ही तरुणी तब्बल साडेपाच हजारांच्या मताधिक्याने निवडून आली. त्यानंतर एबीपी माझाशी त्यांनी खास संवाद साधला. एमआयएमच्या 'पतंगा'मुळे मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे असं सहर शेख म्हणाली.
जितेंद्र आव्हाडांनी शब्द फिरवला
जितेंद्र आव्हाडांनी पालिका निवडणुकीत उमेदवारीचा शब्द देऊनही तो फिरवला. त्यामुळे त्यांना आव्हान देणं गरजेचं होतं. तसं केलं नसतं तर मी अल्लाहला काय उत्तर दिलं असतं? असं सहर शेख म्हणाली.
सहर शेख म्हणाली की, "शरद पवारांची राष्ट्रवादी ज्या दिवसापासून स्थापन झाली होती त्या दिवसापासून माझे वडील राष्ट्रवादीचे मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती, त्यांचा तो अधिकार होता. त्यांनी जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा दिला आणि त्यांना जिंकवून आणलं. जितेंद्र आव्हाडांनीच माझं नाव आधी जाहीर केलं होतं. आव्हाडांनी तसा अनेक लोकांसमोर माझ्या वडिलांना शब्द दिला होता. पण नंतर त्यांनी तो शब्द फिरवला. त्यामुळेच त्यांना जर आम्ही आव्हान दिलं नसतं तर ते आमच्यासाठी चुकीचं ठरलं असतं, अल्लाहला आम्ही काय उत्तर दिलं असतं?
एमआयएमचे तिकीट कसे मिळाले?
सहर शेख म्हणाली की, "शेवटच्या दिवसापर्यंत मला तिकीट देणार असल्याचं जितेंद्र आव्हाड सांगत होते. त्यावेळी आम्ही सर्वात मोठी रॅली काढली. तरीही त्यांनी दिलेला शब्द फिरवला. हे असे नेते लोकांना शब्द देतात, त्याच्यामागचा त्यांचा हेतू समजवून घ्यावा लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत असे आपल्याला ताटकळत ठेवतात म्हणजे आपण इकडचे पण राहणार नाही आणि तिकडचेही राहणार नाही. आम्हाला जर आधीच माहिती असतं तर आमच्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी तयार होती. पण ते भाजपसोबत असल्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हटलं. त्यामुळेच ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचं ठरवलं."
ज्यावेळी फॉर्म भरायले गेले त्यावेळी आतमध्ये काँग्रेस आणि एमआयएमचे लोक समोर एबी फॉर्म घेऊन उभे होते. त्यावेळी एमआयएमची ऑफर आल्यानंतर ती मला अल्लाहने पाठवल्याचा भास झाला. त्याचवेळी मी त्यांची ऑफर स्वीकारली आणि एमआयएममधून लढून जिंकले असं सहर शेख म्हणाली.
अल्लाहने बुद्धी दिली
इतर उमेदवारांचा प्रचार केला असता तर संपूर्ण मुंब्रामध्ये एमआयएमचे नगरसेवक निवडून आले असते असं सहर शेख म्हणाली. ती म्हणाली की, तुतारीवाले उमेदवार एमआयएमच्या विरोधात फक्त 200-300 मतांच्या फरकाने जिंकले आहेत. पण माझा विजय हा साडे पाच हजार मतांनी झाला आहे. मी त्यावेळी इतर उमेदवारांचा प्रचार केला असता तर संपूर्ण मुंब्रामध्ये एमआयएमचे उमेदवार निवडून आले असते असा माझा विश्वास आहे."
प्रचार करताना माझ्या वडिलांना सौम्य हृदयविकाराचा धक्का बसला होता. पण अशावेळीही मला अल्लाहने बुद्धी दिली, ताकद दिली. स्वतंत्र लढले असते तर मी निवडून आले असते, पण त्यासाठी अजून कष्ठ करावे लागले असते. त्यामुळे एमआयएमची उमेदवारी घेतल्याचं सहर शेखने स्पष्ट केलं.
कोणताही पक्ष धर्मनिरपेक्ष किंवा धर्मांध नसते, तर तुमचा विचार तसा असतो. तुमचे विचार हे धर्मनिरपेक्ष असायला हवेत, मग पक्ष कोणताही असो असं सहर शेखने स्पष्ट केलं. एमआयएमच्या 'पतंगा'मुळे मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. जितेंद्र आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचा चार नगरसेवक पाडले अशा शब्दात तिने आव्हाडांवर टीका केली.
व्हायरल व्हिडीओवर काय म्हणाली?
'कैसा हराया' असं वक्तव्य करणारा सहर शेखचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यावर बोलताना सहर शेख म्हणाली की, "ते बोलणं गरजेचं होतं, कारण जितेंद्र आव्हाडांना अहंकार होता. आम्ही हरणार असं त्यांना वाटायचं. त्यांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचे चार नगरसेवक कापले. त्यामुळे चारही जागा जिंकल्यानंतर ते वाक्य हृदयातून आलेलं वाक्य होतं."
एमआयएमचे हा एक असा पक्ष आहे ज्याचे विचार धर्मनिरपेक्ष आहेत. आम्ही फक्त बोलण्यातून धर्मनिरपेक्ष नाही तर विचारांनेही धर्मनिरपेक्ष आहोत. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन जाणार आहोत. शिक्षण, आरोग्यावर यापुढे काम करणार असं सहर शेख म्हणाली.
मुंब्रामध्ये नोटाला 12 हजार मतदान मिळालं आहे. त्यावर बोलताना सहर शेख म्हणाली की, "ज्या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार नव्हते त्या ठिकाणी नोटाला मतदान करा असं आवाहन केलं होतं. ते मुंब्रामध्ये कामाला आलं, कारण आव्हाडांच्या एकाही उमेदवाराला एकही मत जाऊ नये असं माझं मत होतं."
ही बातमी वाचा:




















