राजस्थानचं भविष्य एकनाथ शिंदेंच्या हातात, निवडणूक प्रचारात होणार मुख्यमंत्र्याची एन्ट्री
मुख्यमंत्री यापूर्वी कर्नाटक निवडणुकांवेळीही प्रचाराला गेले होते. त्यानंतर आता राजस्थानला जात असल्याने शिवसेनेचा आता महाराष्ट्राबाहेरही राजकीय विस्तार करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे.
जयपूर: राजस्थानच्या निवडणुकीचा (Rajsthan Assembly Ekection) प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे जाणार असल्याची महिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारच्या कथित भ्रष्टाचाराची लाल डायरी विधानसभेत दाखवणारे आमदार अशी गुढांची ओळख. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. तर मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक झालेले व्यापारी हे मतदानाकरता राजस्थानला जातात, या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रात घडलेल्या राजकिय सत्तांतरानंतर मुख्यमंत्री यापूर्वी कर्नाटक निवडणुकांवेळीही प्रचाराला गेले होते. त्यानंतर आता राजस्थानला जात असल्याने शिवसेनेचा आता महाराष्ट्राबाहेरही राजकीय विस्तार करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे.
कोण आहेत राजेंद्र गुढा
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी मतदार संघाचे आमदार राजेंद्र हे गुढा गावात राहणारे आहेत.राजेंद्र यांनी आपल्या नावासोबत गुढा या गावाटचे नाव देखील जोडले आहे. त्यानंतर ते राजेंद्र गुढा या नावाने ओळखले जात आहेत. राजेंद्र गुढा यांनी 2018 साली बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडुन आले आहेत.
काय आहे लाल डायरी?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून लाल डायरीची चर्चा भलतीच रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एका लाल डायरीत राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराचा आलेख असल्याचा उल्लेख अमित शाहांनी केला होता. तेव्हापासूनच राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजली होती. हीच लाल डायरी गुढांकडे असल्याचं बोललं जात आहे. भाजपने तर आपल्या निवडणुकीच्या भाषणांमध्ये जाहीरपणे आपण सत्तेत आलो तर लाल डायरीची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.
गुढा यांनी लाल डायरीची तीन पानं प्रसिद्ध
आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांच्या घरावर पडलेल्या इनकम टॅक्सच्या छाप्यांपूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती, असा दावा राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत केला होता. त्या दिवशी राजस्थानच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरीबाबत गुढा यांनी गेहलोत सरकारविरोधात सातत्यानं आरोपांची माळच लावली होती. गुढा यांनी लाल डायरीची तीन पानंही प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. तेव्हापासूनच भाजपनं सातत्यानं लाल डायरी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून जेपी नड्डा यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यानं लाल डायरीच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारला घेरलं आहे.