Rajnath Singh : पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना राजनाथ सिंह यांची अतिशयोक्ती; म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मोदींनी दिला
Rajnath Singh : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अतिशयोक्ती केल्याचे बघायला मिळाले आहे.
वसई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Modi) कौतुक करताना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी अतिशयोक्ती केल्याचे बघायला मिळाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना भारतरत्न दुसरे-तिसरे कोणीही दिले नसून पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचा अजब दावा राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी वर्षानुवर्षे विलंब केला, जो नरेंद्र मोदी यांनी दिला” असे राजनाथ सिंह यांनी वसई येथील आपल्या भाषणात सांगितले.
मात्र, बाबासाहेबांना भारतरत्न 31 मार्च 1990 ला तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांनी घोषीत केला आणि 14 एप्रिल 1990 साली तत्कालीन राष्ट्रपती वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी हा पुरस्कार स्विकारला होता. मात्र राजनाथ सिंह यांनी बोलताना चुकीची माहीती दिली असल्याचे पुढे आले आहे.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे सरकार असणे आवश्यक
वसई पश्चिमेतील दिवानमाण येथील कल्पतरू मैदानावर संरक्षण मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकारची गरज अधोरेखित केली आणि विरोधकांवर जोरदार टीका देखील केली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात आमचे सरकार आलं तर 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवू,” असे राजनाथ सिंह यांनी आश्वासन दिले.
भारत आज जागतिक श्रीमंतीत टॉप 5 मध्ये असून, 2027 पर्यंत टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल, असेही त्यांनी सांगितले. 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर आणण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रतिमहिना 1500 मिळणार आहे, हे रक्कम सुरक्षित राहील. तर आयुष्यमान भारत योजनेनुसार 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य उपचार होत आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं वाढवण बंदराची उभारणी या सरकारने केली असल्याचेही ते म्हणाले.
मोदींना जो सन्मान मिळाला तो आजपर्यंत कोणत्याही भारतीय नेत्याला मिळाला नाही
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी वर्षानुवर्षे विलंब केला, जो भाजपाने दिला, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले. राहुल गांधींवर टीका करत संविधानाच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही राजनाथ सिंह यांनी केला. विरोधी पक्ष आपापसांत भांडत असून, ते महाराष्ट्राला फक्त ‘एटीएम’ म्हणून पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली. मोदी सरकारचा जागतिक स्तरावरील सन्मान होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावर मिळालेला सन्मान आजपर्यंत कोणत्याही भारतीय नेत्याला मिळालेला नाही, असे त्यांनी गौरवाने नमूद केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. “आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, काँग्रेसने कधीच तसे केले नाही,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या कामगिरीवर भर दिला. तसेच सभेच्या शेवटी त्यांनी स्नेहा दुबे यांना विजयी करण्याचे आवाहन करत आपले भाषण संपवले.
हे ही वाचा